कोल्हापूर महापालिकेत चक्क जिवंत कर्मचाऱ्यास श्रद्धांजली..!

By Admin | Published: August 22, 2016 08:32 PM2016-08-22T20:32:57+5:302016-08-22T20:32:57+5:30

नेत्यांचा उथळपणा चेष्टेचा विषय कसा बनतो, याची प्रचिती सोमवारी महानगरपालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात आली

Tribute to a living employee in Kolhapur Municipal Corporation! | कोल्हापूर महापालिकेत चक्क जिवंत कर्मचाऱ्यास श्रद्धांजली..!

कोल्हापूर महापालिकेत चक्क जिवंत कर्मचाऱ्यास श्रद्धांजली..!

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २२ : नेत्यांचा उथळपणा चेष्टेचा विषय कसा बनतो, याची प्रचिती सोमवारी महानगरपालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात आली. आपल्यापर्यंत आलेली माहिती खरी आहे की खोटी, याची कोणतीही खात्री न करता लगोलग एखाद्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहणे म्हणजे मूर्खपणाचेच लक्षण म्हणायला पाहिजे. नेत्यांच्या उथळपणामुळे हा मूर्खपणा महानगरपालिकेत घडला आणि चक्क जिवंत कर्मचाऱ्यालाच दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहिली गेली!

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निषेधार्थ सोमवारी एक दिवसाचे ‘काम बंद’ आंदोलन केले. आयुक्त कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याने सर्व कर्मचारी ताणतणावाखाली आहेत. काही कर्मचारी, अधिकारी राजीनामा देऊन घरी गेले; तर काहीजण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशा प्रकारची वातावरणनिर्मिती सोमवारच्या आंदोलनातून कर्मचारी संघ व त्यांच्या नेत्यांनी केली. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात कर्मचाऱ्यांची निषेध सभा सुरू असतानाच एका व्यक्तीने ताराराणी चौक विभागीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाकडील एक कर्मचारी अशाच ताणतणावाखाली हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निवर्तल्याची बातमी आणली.

आधीच तणाव असताना त्यात कर्मचाऱ्याच्या निधनाची बातमी आल्याने सभेच्या ठिकाणी अधिकच अस्वस्थता पसरली. कर्मचारी व नेत्यांनी कसलीही खात्री न करता महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला यांच्या उपस्थितीत चक्क त्या कर्मचाऱ्यास श्रद्धांजली वाहिली! दोन मिनिटे स्तब्धताही पाळण्यात आली. महापौर तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी चर्चेसाठी कार्यालयात गेले तोवर आणखी एक कर्मचारी माहिती घेऊन आला आणि ज्याला आपण श्रद्धांजली वाहिली, तो कर्मचारी जिवंत असल्याचे त्याने सांगितले! सगळ्यांनाच हायसे वाटले; पण नेतेमंडळींनी केलेल्या उथळपणाबद्दल थेट नाराजीही व्यक्त केली.

मागे एकदा अशाच ताणतणावातून विद्युत शाखेचे अभियंता पोतदार, कामगार अधिकारी नितीन भाकरे यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. त्यामुळे सोमवारी महापालिका चौकात आलेल्या निधनाच्या बातमीवर सर्वच कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवला. एकदा महापालिकेची सभा सुरू असताना माजी महापौरांचे निधन झाल्याची अशीच अफवा पसरली होती. तेव्हा सभेचे कामकाज तहकूब ठेवून चौकशी करण्यात आली, तेव्हा ती अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Tribute to a living employee in Kolhapur Municipal Corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.