वाहतुकीचा होतोय खेळखंडोबा
By admin | Published: April 4, 2017 01:44 AM2017-04-04T01:44:19+5:302017-04-04T01:44:19+5:30
मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुनावळे ते किवळे रस्त्याच्या दरम्यान महामार्गाची दुरवस्था झाली
रावेत : मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुनावळे ते किवळे रस्त्याच्या दरम्यान महामार्गाची दुरवस्था झाली असून, महामार्गावरील रुंदीकरण आणि दुरुस्तीचे कामे रखडल्याने वाहतुकीचा खेळ खंडोबा होत असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांची दैना झाल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे.
यातच या महामार्गावर पवना नदी पात्रावरील सेवा रस्त्यावरील दोन नवीन पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाल्याने काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या पुलावर असणारे संरक्षक कठडे अपूर्ण अवस्थेत असताना प्रशासनाने मात्र रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने कोठेही फलक लावले गेले नाहीत. पुनावळे ते किवळेदरम्यान सेवा रस्ता संपूर्ण उखडला आहे. मुकाई चौक ते पुनावळेदरम्यान ठिकठिकाणी सेवा रास्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. याचदरम्यान ऐन महामार्गावर ठिकठिकाणी अनधिकृतपणे मोठी अवजड वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे.
पुनावळे ते किवळेदरम्यान ठिकठिकाणी अनधिकृत वाहनतळ थाटण्यात आली आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग नियमानामध्ये महामार्गावर अशाप्रकारे वाहने पार्किं ग करण्याचा अधिकार नसून हे सर्व नियमबाह्य आहे. आणि याचा मोठा अडथळा वाहतुकीला होत आहे. त्यातच रस्त्याच्या मधोमध आणि कडेला लावण्यात आलेल्या संरक्षक बॅरिकेट ठिकठिकाणी तुटले आहेत तर काही ठिकाणचे गायब झाले आहेत. नागरिक स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. त्यामुळे काहीवेळा अपघात घडून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी रस्त्याच्या, पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. परंतु अद्याप हे काम पूर्ण झाले नसल्याने येथे सर्वांची फरफट सुरू आहे.
त्यातच या पतिसरात दोनही बाजूंचे सेवा रस्ते या कामामुळे उचकटल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील कामाचे सर्व साहित्य राडारोडा सेवा रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे. या दरम्यान, दिशादर्शक फलकांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे कोणता रस्ता कोणीकडे जातो हे वाहनचालकांना लक्षात येत नाही. आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे, रिफ्लेकटर बसविणे आवश्यक असताना येथे मात्र याचा अभाव दिसून येतो. (वार्ताहर)
>तुटलेले कठडे : अपघाताची शक्यता
रावेतच्या पवना नदीवरील पुलाचे कठडे अनेक ठिकाणी तुटल्याने येथील वाहतूक धोकादायक झाली आहे. अनेकवेळा येथे किरकोळ अपघात घडले आहेत. तर नव्याने बांधण्यात आलेल्या सेवा रस्त्यावरील पुलावर कठडे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास सरळ नदीपात्रात वाहन जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे.