चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी प्रयत्न
By admin | Published: October 1, 2016 03:31 AM2016-10-01T03:31:19+5:302016-10-01T03:31:19+5:30
अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडलेल्या व पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय जवानाच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
नवी दिल्ली/धुळे/जळगाव : अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडलेल्या व पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय जवानाच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुळचा धुळे जिल्ह्यातील व ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये असलेला जवान चंदू बाबुलाल चव्हाण यांच्या सुटकेसाठी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची दिल्लीत भेट घेतली. चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याचे सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
चव्हाण यांची आजी लिलाबाई चिंधू पाटील यांना जामनगर येथे हे कळताच हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पाककडे पाठपुरावा : चंदू यांच्या सुटकेचा मुद्दा पाकिस्तानपुढे मांडण्यात येईल. सैन्य अभियानाच्या महासंचालकांनी ही माहिती हॉटलाइनद्वारे पाकिस्तानला दिली आहे. पाकमध्ये करण्यात आलेला हल्ला आणि या जवानाने चुकून पार केलेली नियंत्रण रेषा यांचा काहीही संबंध नाही, अशी माहिती सैन्य दलाने दिली आहे.
चव्हाण यांना भारतात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. भारत वा पाकचे जवान नियंत्रण रेखा ओलांडणे या घटना नित्याच्याच आहेत. असे प्रकार अनावधानाने घडत असतात़ त्याबाबत दोन्ही देशांच्या लष्कराकडून एकमेकांना माहिती दिली जाते. कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर, दोन्ही देशांतील प्रत्यार्पण करारानुसार जवानांना देशात परत पाठविले जाते. साधारणपणे २० दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होते. - डॉ. सुभाष भामरे, संरक्षण राज्यमंत्री