त्र्यंबकेश्वरमध्ये सर्व आखाड्यांचे शाही स्नान संपन्न
By Admin | Published: September 25, 2015 06:19 AM2015-09-25T06:19:27+5:302015-09-25T14:13:10+5:30
एकादशी व प्रदोषच्या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्तात आज शुक्रवारी शैवपंथीय साधू-महंतांनी शेवटच्या शाही स्नानाची पर्वणी साधली आहे.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २५ - एकादशी व प्रदोषच्या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्तात आज शुक्रवारी शैवपंथीय साधू-महंतांनी शेवटच्या शाही स्नानाची पर्वणी साधली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्यासोबत विजय भटकर, गिरीश महाजन, सुधींद्र कुलकर्णी उपस्थित होते. कैलास मान सरोवरतील तीर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकच्या कुशवर्तात अर्पण केले गेले.
तब्बल १२ वर्षांनी आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या पर्वाचा अध्याय पिंपळद येथील आखाड्यातून पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी प्रथम जुन्या आखाड्याच्या मिरवणूकीस सुरुवात झाली. सर्व आखाड्यांचे स्नान संपन्न झाल्यानंतर १२ वाजता सामान्य भाविकांना स्नानासाठी कुंड खुले करण्यात आले.
आज कुंभपर्वाची अखेरची पर्वणी असल्याने भाविकांची विक्रमी गर्दी झाली होती. पहाटे शाही मिरवणूकीला सुरुवात होण्यापूर्वी शाही मार्गावर भाविकांनी रांगोऴ्यांच्या पायघड्यानी साधू-संतांचे स्वागत केले.
आज पहाटेपासून जूना दशनाम, निरंजनी, आनंद, अग्नी, जुना, आवाहन, निर्मोही, महानिर्वाण, अटल आखाडा, निर्मल आखाड्यातील साधूंचे स्नान संपन्न झाले. नागासाधू, गोल्डनबाबा हे विशेष आकर्षण ठरले.
यंदाच्या पर्वात २९ ऑगस्ट, १३ सप्टेंबर रोजी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील दोन पर्वण्या निर्विघ्न पार पडल्या. १८ सप्टेंबर रोजी नाशिकला भरपावसात अखेरची पर्वणी झाल्यानंतर सर्वांनाच त्र्यंबकच्या पर्वणीचे वेध लागले होते.
नाशिकची अखेरची पर्वणी शांततेत झाल्यानंतर प्रशासनाने त्र्यंबकची अंतिम पर्वणी त्याच पध्दतीने व्हावी, यासाठी जय्यत तयारी केली आहे. कुंभमेळ्याच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जवळपास सात हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. कुशावर्त तीर्थ, मिरवणूक मार्ग व इतर महत्वपूर्ण ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात आहे. पहिल्या पर्वणीतील कडेकोट बंदोबस्तावरून आगपाखड झाल्यावर नियोजनात अनेक फेरबदल करण्यात आले. त्याची अंमलबजावणी दुसऱ्या पर्वणीत झाल्यामुळे भाविकांचा रोष काहिसा कमी झाला आहे.