त्र्यंबकेश्वर झळाळले!
By admin | Published: September 26, 2015 02:52 AM2015-09-26T02:52:05+5:302015-09-26T02:52:18+5:30
सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरच्या व तृतीय शाहीपर्वणीत शुक्रवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दहाही आखाड्यांतील शैवपंथीय साधू-महंतांनी शाही थाटात मिरवणुकीने येत कुशावर्तात स्नान केले.
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरच्या व तृतीय शाहीपर्वणीत शुक्रवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दहाही आखाड्यांतील शैवपंथीय साधू-महंतांनी शाही थाटात मिरवणुकीने येत कुशावर्तात स्नान केले. महिनाभरापासून अखंडपणे सुरू असलेल्या मंगलमय कुंभपर्वाची समाप्ती होत असतानाच लाखो भाविक कुशावर्तात स्नान करत त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक झाले.
त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी भाविकांना सुमारे २० कि.मी. पायपीट करावी लागल्याने पहिल्या पर्वणीचीच पुनरावृत्ती झाल्याने एसटी महामंडळासह प्रशासनाला भाविकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागले.
गुरुवारी रात्री साडेबारा वाजता आॅब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन, महाराष्ट्र सरकार आणि चीन दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने ‘होली वॉटर डिप्लोमसी’ अर्थात राजकीय संस्कृती मिलाफाच्या दृष्टीने मानसरोवरातील पवित्र जल त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तात तर कुशावर्तातील पवित्र जल मानसरोवरात नेण्याचा उपक्रम पार पडला.
त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत पूजेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशावर्तात जल टाकले. सुधींद्र कुलकर्णी, अंजली भागवत, डॉ. विजय भटकर, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे,आ. बाळासाहेब सानप यांच्यासह चिनी दूतावासातील वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून गोदापूजन
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी शुक्रवारी रामकुंडावर गोदावरी मातेचे अभिषेक व पूजन करुन पवित्र स्नान केले. त्यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी गोदापूजन केले.
कैलास मानसरोवरातील जल व गोदावरीच्या पवित्र जलाचा संगम हा दोन संस्कृतीचा आणि आस्थांचा संगम आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा विशेष स्मरणीय राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
----
शाही मिरवणुकीत महिला महंत व महामंडलेश्वरांचा सहभागही लक्षणीय होता. अपूर्वानंद माताजी, माता सुनीतानंदगिरीजी आपल्या शेकडो भक्तांसह मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
पंचायती महानिर्वाणी आखाड्याच्या मिरवणुकीत जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील स्वामी कृष्णचैतन्य पुरीजी महाराज यांचा खालसा सहभागी झाला होता. बीड जिल्ह्यातीलही एक खालसा या मिरवणुकीत होता. या दोन्ही मराठी खालशांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
अंगावर चार किलोपेक्षा अधिकचे सुवर्ण दागिने मिरवणाऱ्या गोल्डनबाबांना मिरवणुकीत सर्वाधिक प्रतिसाद मिळत होता.
-------
पहिल्या दोन पर्वण्यांच्या दरम्यान साधू-महंतांसह नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले परमहंस नित्यानंद महाराज शुक्रवारी (२५) च्या तिसऱ्या व अंतिम स्नानासाठी हजर नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला.