एसटीच्या कॉल सेंटरवर ‘चौकशी’साठी ट्रिंग-ट्रिंग, पहिल्याच दिवशी लाइन व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:53 AM2017-11-18T02:53:44+5:302017-11-18T02:54:12+5:30
राज्यभरातील प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या कॉल सेंटरला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला. अनेक वर्षे केवळ कागदावर राहिलेले कॉल सेंटर गुरुवारी सुरू झाले.
मुंबई : राज्यभरातील प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या कॉल सेंटरला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला. अनेक वर्षे केवळ कागदावर राहिलेले कॉल सेंटर गुरुवारी सुरू झाले. शुक्रवारी संध्याकाळी सहापर्यंत १८००२२१२५० या टोल फ्री क्रमांकावर १,७०० फोन आल्याचा दावा महामंडळाने केला आहे. यापैकी सुमारे ८० टक्के प्रवाशांनी चौकशीसाठी विचारणा केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. मात्र, पहिल्याच दिवशी कॉल सेंटर हेल्पलाइन व्यस्त लागत असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती.
राज्यातील सुमारे ५७ लाख प्रवासी रोज एसटीने प्रवास करतात. त्यांच्या सोयीसाठी हे कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने कॉल सेंटरसाठी एका खासगी कंपनीसोबत ३ वर्षांचा करार केला आहे. करारान्वये पहिल्या टप्प्यात कॉल सेंटर सुरू झाले. गुरुवारी दुपारी कॉल सेंटरचे उद्घाटन झाले. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत १,७०० कॉल आले असून सर्वाधिक फोन हे बस फेºयांच्या चौकशीसाठी आल्याची माहिती एसटीचे जनसंपर्क अधिकारी ए. एस. तांबोळी यांनी दिली. यापैकी ८० टक्के फोन चौकशीसाठी होते, असेही तांबोळी यांनी स्पष्ट केले.
कॉल सेंटर हे तीन शिफ्टमध्ये चोवीस तास सुरू राहणार आहे. सद्यस्थितीत तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी ३ प्रतिनिधी प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करणार आहेत.
बसचे वेळापत्रक, एसटी आरक्षण, प्रवासी सूट माहिती आणि तिकीट दर यांचा समावेश चौकशीसाठी आलेल्या कॉलमध्ये होता. ८० टक्के फोन हे चौकशीसाठी आले. उर्वरित फोन कॉल्स तक्रारी आणि सूचनांसाठी आल्याची माहिती महामंडळाने दिली. पहिल्याच दिवशी बहुतांशी प्रवाशांसाठी ‘हेल्पलाइन’ व्यस्त आली. त्यामुळे बहुतांशी प्रवाशांचा हिरमोड झाला.
मनुष्यबळ वाढविणार
पहिल्या दिवशी कॉल सेंटरला चांगला प्रतिसाद लाभला आहे. प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक व्यस्त असल्याचे समजले. याबाबत कॉल सेंटरमध्ये मनुष्यबळ वाढविण्याबाबत विचार सुरू आहे. लवकरच त्या संदर्भात योग्य पावले उचलली जातील.
- रणजीत सिंह देओल, एसटी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक