मुंबई, ठाण्यात तिहेरी हत्याकांड

By admin | Published: June 24, 2016 04:59 AM2016-06-24T04:59:52+5:302016-06-24T04:59:52+5:30

एकाच दिवशी घडलेल्या दोन तिहेरी हत्याकांडांमुळे मुंबई व उल्हासनगरचा परिसर हादरून गेला आहे. मुंबईच्या मालवणी भागात बबली मानव शॉ यांची दोन नातवंडांसह तीक्ष्ण हत्यारांनी निर्घृण

The triple murder case of Thane in Mumbai | मुंबई, ठाण्यात तिहेरी हत्याकांड

मुंबई, ठाण्यात तिहेरी हत्याकांड

Next

मुंबई/ उल्हासनगर : एकाच दिवशी घडलेल्या दोन तिहेरी हत्याकांडांमुळे मुंबई व उल्हासनगरचा परिसर हादरून गेला आहे. मुंबईच्या मालवणी भागात बबली मानव शॉ यांची दोन नातवंडांसह तीक्ष्ण हत्यारांनी निर्घृण हत्या करण्यात आली. तर उल्हासनगरजवळील करवले गावात शंकर भंडारी यांच्यासह पत्नी व मुलाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले.
मालवणीत बबली मानव शॉ (५०), आर्यन शेख (१३) आणि सानिया शेख (१०) हे तिघे गेट क्रमांक ६ मधील प्लॉट क्रमांक २३च्या साबरी हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होते. सकाळी १० वाजले तरी बबली पाणी भरण्यासाठी बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे शेजारच्या तब्बसुम या मुलीने त्यांना उठविण्यासाठी दरवाजा ठोठावला. मात्र कोणीही दार उघडले नाही. अन्य एक दरवाजा अर्धवट उघडा असल्याने त्यातून पाहिले असता बबली शॉ या दोन नातवंडांसह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. मालमत्तेच्या वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडले असल्याचा अंदाज आहे.

तर उल्हासनगरच्या करवले गावात भंडारी कुटुंब राहते. शंकर नामदेव भंडारी (६०) यांना चार मुले असून पत्नी फसुबाई (४८), मुलगा सन्नी आणि सुनीलसह ते एकत्र राहतात. रामनाथ आणि अनिल ही दोन मुले गावातच वेगळ्या घरात राहतात. अनिल सासुरवाडीवरून परत येताना सकाळी घरात आला असता आई आणि वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याला दिसले. त्यांच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेल्या दोन कुऱ्हाडी सापडल्या. सन्नीचा (२८) मृतदेह घरात अंथरूणावर पडलेला होता. दुसरा मुलगा सुनील गावात गेला होता. त्यामुळे तो बचावला. घरातील दागिन्यांचे डबे शेजारच्या शेतात सापडले. हत्या केल्यावर दरोडेखोरांनी परत जाताना सोने काढून हे डबे फेकल्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

हत्येचे गूढ कायम...
मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात दोन शाळकरी भावडांसह त्यांच्या आजीचा निर्घृण हत्या करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बबली शॉ (वय ५०), नातू अयान शेख (१३) व नात सानिया (१०) अशी त्यांची नावे असून, हल्लेखोराने चाकूने भोसकून खून केला आहे. गुरुवारी सकाळी पहिल्यांदा शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. या भीषण घटनेतील मारेकरी व हत्येमागील कारणाचा रात्री उशिरापर्यंत उलगडा होऊ शकलेला नाही. पूर्ववैमनस्य किंवा प्रॉपर्टीच्या वादातून हे हत्याकांड घडले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत मृत महिलेचा जावई इस्माइल शेख व अन्य नातेवाईकांकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बबली शॉ या नातवांसह मालवणीच्या गेट क्रमांक सहा येथील प्लॉट क्रमांक २३च्या साबरी को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये राहत होत्या. सकाळी दहा वाजले तरी नेहमीप्रमाणे त्या पाणी भरण्यासाठी बाहेर न आल्याने, शेजारी राहणाऱ्या तबस्सुम नावाच्या तरुणीने शॉ यांना पाणी भरण्यासाठी आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद न असल्याने तिने घरासमोर जाऊन पाहिले असता, घरचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. मात्र, दुसरा दरवाजा अर्धवट उघडा होता, जो तिने बाहेरून ढकलला, तेव्हा शॉ आणि तिच्या दोन नातवंडांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिने पहिले. तेव्हा तिने आरडाओरड करत अन्य शेजाऱ्यांना बोलाविले. त्यानंतर, मालवणी पोलिसांना कळविण्यात आले.

शॉ यांची मुलगी अफसा हिचे इस्माइल शेख याच्याबरोबर आंतरधर्मीय विवाह झाला होता. तीन वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या दोन मुलांचे संगोपन शॉ करत होत्या. जावई इस्माइल शेख याने दुसरे लग्न केले. त्या वेळी त्याच्या नावावर असलेली काही प्रॉपर्टी शॉ यांच्या नावावर केली होती. त्यानुसार, या मिळकतीतील भाग असलेल्या काही रूमचे भाडे, तसेच शॉ व्याजावर देत असलेल्या पैशांच्या जोरावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. या प्रॉपर्टीवरून काही वाद होते का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. त्यानुसार, सध्या पोलिसांनी चौकशीसाठी इस्माइल आणि शॉ यांची एक बहीण, तसेच तिच्या मुलाला ताब्यात घेतल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने, सहायक पोलीस श्रीरंग नाडगौडा, मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले, क्राइम ब्रांचच्या कक्ष-११चे प्रमुख चिमाजी आढाव, तसेच अन्य अधिकारी घटनास्थळी गेले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते विच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)

चोरीच्या उद्देशाने हत्या नाही
बबली शॉ आणि त्यांच्या नातवंडांची हत्या ही प्रथमदर्शनी तरी चोरीच्या उद्देशाने झाली नसल्याचे समजते. त्यामुळे प्रॉपर्टी किंवा पूर्ववैमनस्य यातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शॉ यांनी नुकतीच एक प्रॉपर्टी विकली होती. त्याचे अठ्ठावीस लाख रुपये येणे होते. त्यामुळे त्या पैशांसाठी त्यांची हत्या झालीय का, याचीही माहिती मिळविण्याचे काम पोलीस करत आहेत. मात्र, प्रथमदर्शनी तरी या हत्येचा उद्देश चोरी नसल्याचे उघड होत आहे. कारण शॉ यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंगावरील एकही दागिना चोरीला गेलेला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मारेकऱ्यालाही जखम ?
तिघांची हत्या करणारा मारेकरीही या घटनेत जखमी झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. शॉ यांच्या घराच्या मागील गल्लीमध्ये रक्ताचे थेंब पडलेले पोलिसांना आढळले. त्यामुळे झटापटीच्या वेळी आरोपी हा जखमी झाल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शॉ आणि त्यांच्या दोन्ही नातवंडांच्या छातीवर, मानेवर, पाठीवर वार करण्यात आले आहेत. हे वार इतक्या क्रूरपणे करण्यात आलेत की, त्यात हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकूदेखील वाकला आहे. मारेकरी हा हत्या करून शॉ यांच्या घराच्या मागील दरवाज्यातून पसार झाल्याचा अंदाज नाडगौडा यांनी व्यक्त केला. पळताना आरोपी हा प्लॉट क्रमांक पंचवीसच्या गल्लीतून पसार झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

शॉ यांच्या घरामागील एका दुकानाचा डिव्हीआर मालवणी पोलिसांनी हस्तगत केला आहे. यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयित हालचाली होत असून त्यात आरोपीचा चेहरा दिसत असल्याचेही समजते. त्यानुसार, या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

हत्येसाठी पेव्हर ब्लॉकचाही वापर
बेडवर अंथरुणाला बिलगलेले असतानाच मारेकऱ्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. या दरम्यान, आर्यनवर सर्वात जास्त वार करण्यात आले आहेत. तिघांच्याही गळ्यावर, छातीवर, मानेवर, हातावर, कंबरेत निर्घृण वार करण्यात आले आहेत.
हे वार इतक्या क्रूरपणे करण्यात आलेत की, त्यात हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकूदेखील वाकला आहे. आर्यनच्या मृतदेहाशेजारून हा चाकू हस्तगत करण्यात आला, तर जमिनीवर पडलेल्या महिलेच्या मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला पेव्हर ब्लॉकही पोलिसांनी हस्तगत केला आहे.


उल्हासनगरातही तिहेरी हत्याकांड
उल्हासनगर : उल्हासनगरजवळील करवले गावात भंडारी कुटुंबातील तिघांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या झाल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. घरातील लाखोंचा ऐवज लंपास झाल्याचेही प्राथमिक तपासात आढळून आले.

उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करवले गावात भंडारी कुटुंब राहते. शंकर नामदेव भंडारी यांना चार मुले असून, पत्नी फसूबाई, मुलगा सनी आणि सुनीलसह ते एकत्र राहतात. रामनाथ आणि अनिल ही दोन मुले गावातच वेगळ्या घरात राहतात. मधला मुलगा अनिल सासरवाडीवरून येताना सकाळी त्याने घरात डोकावून पाहिल्यावर, आई आणि वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याला दिसले. त्यांच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेल्या दोन कुऱ्हाडी सापडल्या. सनीचा मृतदेह घरात अंथरुणावर पडलेला होता. दुसरा मुलगा सुनील गावात गेला होता. त्यामुळे तो बचावला. अनिलने तातडीने हिललाइन पोलिसांना माहिती दिली.

सकाळी साडेपाचच्या सुमारास मोठा मुलगा रामनाथ गायीचे दूध घेऊन गेला होता. त्यानंतर, सहाच्या सुमारास हे हत्याकांड घडल्याचा संशय आहे. शंकर नामदेव भंडारी (६०), फसूबाई भंडारी (४८), सनी भंडारी (२८) यांची निर्घृण हत्या झाली असून, त्यातील शंकर आणि फसूबाई घरात दरवाजाजवळ झोपले होते, तर सनी घरात झोपलेला होता. या हत्येनंतर घरातील दागिन्यांचे डबे शेजारच्या शेतात सापडले. हत्या केल्यावर दरोडेखोरांनी परत जाताना सोने काढून हे डबे फेकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हिललाइन पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खून आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखा, गुप्तेहर शाखा, स्थानिक पोलीस विविध मार्गांनी हत्येची चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)

हल्ल्याची भीती होती...
मनिषा म्हात्रे, मुंबई
पश्चिम बंगालमधील हावडामध्ये असलेली मालमत्ता विकल्यानंतर बबली शॉ यांनी शेजाऱ्यांकडे बँकेत लॉकर उघडण्यासाठी मदत मागत होत्या. आपल्यावर कोणाचा तरी हल्ला होईल, या भीतीने त्यांनी आठवड्यापूर्वी घराच्या दरवाजाला लोखंडी जाळी बसवून घेतली होती. ‘मुझे कोई मार न डाले, अशा शब्दात तिने इस्माईलची बहिण पायल पुजारी हिच्याकडे भीती व्यक्त केली होती. त्यामुळे प्रापर्टीच्या वादातून त्यांच्यासह दोघा निष्पाप जिवांची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
त्यांची मुलगी तुलसी हिने याच परीसरात राहत असलेल्या मुस्लिम तरुण इस्माईल सोबत प्रेमविवाह केला. त्यात इस्माईलने दुसरा विवाह केल्याने बाबली यांची मुलगी, आर्यन व सायना या तिच्या दोन मुलांसह पाच वर्षांपुर्वी माहेरी परत आली.

वडील असून त्यांच्याविना वाढणाऱ्या या मुलांचे दुर्दैव तिथेच संपले नाही, तीन वर्षांपुर्वी त्यांच्या आईचेही आजाराने निधन झाले व तेव्हापासून त्यांची आजीच त्यांचा सांभाळ करत होती. इस्माईलने त्याच्या मालकीचे असलेले घर या दोन मुलांच्या नावावर केले होते. तपासामध्ये बबली या वेश्यादलाल असल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय त्या भिशी किंवा व्याजाने पैसे देत. कधीकाळी त्या गावठी दारूचा गुत्ताही चालवत होती. तसेच बबली भाड्याने खोल्या घेई व त्या अन्य व्यक्तींना जास्त भाड्याने देई. बबली यांच्या पार्श्वभूमीचा या हत्याकांडाशी काही संबंध आहे का, याचीही तपासणी पोलीस करत आहेत.

त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर ईस्माईलची बहिणी पायल पुजारी रहाते. तिला बबली यांनी दोन दिवसापूर्वी आपल्या नातवाकडून निरोप देऊन भेटण्यास बोलाविले होते. मात्र कामाच्या व्यापामुळे आपल्याला जाता आले नाही, असे पायल पुजारी हिने सांगितले. बुधवारी रात्री आर्यन व त्याच्या मित्रांनी मिळून परिसरात राहाणाऱ्या एका मुलाला मारहाण केली होती. रमजाननिमित्त परिसरात लागलेल्या जत्रेत या मुलाला गाठून आर्यन व त्याच्या मित्रांनी मारले होते. याचा बदला घेण्यासाठी तर हे हत्याकांड घडलेले नाही ना, ही शक्यताही पडताळून पाहिली जात आहे.

Web Title: The triple murder case of Thane in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.