गोव्यात त्रिवेंद्रम एक्स्प्रेसवर दरोडा
By admin | Published: January 21, 2015 01:39 AM2015-01-21T01:39:26+5:302015-01-21T01:39:26+5:30
मंगलोरहून मुंबईकडे जाणाऱ्या त्रिवेंद्रम-वेरावल एक्स्प्रेसवर मंगळवारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला
कुडाळ (जि़ सिंधुदुर्ग) : मंगलोरहून मुंबईकडे जाणाऱ्या त्रिवेंद्रम-वेरावल एक्स्प्रेसवर मंगळवारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पाचजणांवर चाकूचे वार करून सुमारे ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लुटून पळून जात असताना तीन दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. मात्र, एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याचा कुडाळ पोलीस शोध घेत आहेत. दरोडेखोरांचे कनेक्शन गोवा-मडगाव येथे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
दरोडेखोरांनी पेडणे-गोवा स्थानकादरम्यान चाकू आणि चॉपरचा धाक दाखवून जनरल डब्यातील सर्व प्रवाशांकडील सुमारे ३० हजार रुपयांची रोकड, मोबाईल, घड्याळे मिळून सुमारे ४७ हजारांचा मुद्देमाल लुटला. याला विरोध करणाऱ्या चार ते पाच प्रवाशांवर चाकू आणि ब्लेडचे वार करून जखमी केले, अशी तक्रार या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या गोस्वामी सोनगिरी याने कुडाळ पोलिसांत दिली.
आपल्याबरोबर असलेल्या फैजल असैन राकुट्टी, अब्दुल अजिमल नालकथ, हजमाकोया नालकथ (सर्व रा. केरळ) यांच्याकडील रोकड आणि मोबाईल काढून घेतल्याची माहितीही त्याने दिली. आप्पासाहेब हनुमंत निकम (२७), रविल स. गौडा, विजय रमेश मिरजकर , अशी अटक केलेल्यांची नावे असून, हे सर्वजण कर्नाटकातील रहिवासी आहेत. (वार्ताहर)