बोगस तृतीयपंथी आणि भिकाऱ्यांचा त्रास
By admin | Published: July 14, 2017 02:33 AM2017-07-14T02:33:20+5:302017-07-14T02:33:20+5:30
मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ सध्या बोगस तृतीयपंथी आणि भिकाऱ्यांचा त्रास वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ सध्या बोगस तृतीयपंथी आणि भिकाऱ्यांचा त्रास वाढला आहे. ज्यामुळे भाविकांना, तसेच मुख्यत: महिलांना त्रास होत आहे. याबाबत योग्य ती दखल घेत कारवाई करा, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दादर-माहीम महिला विभाग अध्यक्ष स्नेहल सुधीर जाधव यांनी, स्थानिक सहायक पोलीस आयुक्तांना बुधवारी केली. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या महिलांना या ठिकाणी असलेले तृतीयपंथी त्रास देतात. टॅक्सीतून उतरताच, महिलांच्या अंगाला अश्लीलपणे हात लावून पैशांची मागणी करतात, ज्यामुळे या महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा सगळा प्रकार या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलीस नुसते बघत उभे राहतात. मात्र, तृतीयपंथीयांना रोखण्यासाठी एकही जण पुढे येत नाही.
या तृतीयपंथीयांच्या ठेकेदार बोगस भिकारी महिला आहेत. त्यामुळे महिलांना त्रास देणाऱ्या या तृतीयपंथीयाला एखाद्या सर्वसामान्य माणसाने अटकाव केलाच, तर त्याला दगडाने मारण्याची धमकी दिली जाते. या सगळ्या परिस्थितीमुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे, जाधव यांनी दादरचे सहायक
पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांना सांगितले.
पोलिसांनी यावर कारवाई केली नाही, तर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशाराही एका लेखी निवेदनामार्फत प्रत्यक्ष भेटून त्यांनी दिला. त्या वेळी त्यांच्यासोबत विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि अन्य मनसे पदाधिकारी, तसेच कार्यकर्तेही उपस्थित होते.