गळक्या अंगणवाडीमुळे बालकांना होतोय त्रास
By admin | Published: August 26, 2016 01:21 AM2016-08-26T01:21:14+5:302016-08-26T01:21:14+5:30
वाल्हेनजीक पिंगोरी गावातील अंगणवाडीचा पत्रा फुटल्यामुळे अंगणवाडी खोलीमध्ये पाणी साचत असून, लहान मुलांना ओल असलेल्या ठिकाणी बसावे लागत आहे.
वाल्हे : वाल्हेनजीक पिंगोरी गावातील अंगणवाडीचा पत्रा फुटल्यामुळे अंगणवाडी खोलीमध्ये पाणी साचत असून, लहान मुलांना ओल असलेल्या ठिकाणी बसावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
शेजारीच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. तिचीसुद्धा कौले फुटली असून, भिंतीमध्ये पाणी मुरत आहे. व्हरांड्याचे वासे ओले होऊन कुजून गेले आहेत. मुळात शाळेचे बांधकाम हे जुने झाले असून शाळा उंचावरती आहे.
पिंगोरी गाव डोंगरभागात असल्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त असते. माकडांचे वास्तव्य असल्यामुळे ती शाळेच्या छतावर उड्या मारतात. शाळेची कौले व पत्रा जुना झाला आहे. त्यामुळे मोडतोड जास्त होते. पावसाळा चालू होण्याअगोदर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदीप दुर्गाडे यांनी शाळेचे छत शाकारून घेतले होते.
>ग्रामस्थ म्हणाले, की प्रस्ताव
देऊनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. याबाबत लोकमतने गेल्या पावसाळ्यामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याकडेही प्रशासनाने लक्ष दिले नाही. सध्या शाळेचा पटही चांगला आहे. गुणवत्ताही चांगली आहे. पाऊस आला, की ग्रामस्थ मुलांना शाळेत पाठविण्यास घाबरतात. परिणामी त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.
>जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देऊन होणारा अनर्थ टाळावा, असे ग्रामस्थांचे मत आहे. याबाबत या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की स्वत: लक्ष घालतो. तुम्ही जागा दिली, तर खोल्यांना मंजुरी आणतो. तोपर्यंत तात्पुरती दुरुस्ती करता येते का, ते पाहू.