पदपथावरील अतिक्रमणांचा त्रास

By admin | Published: July 23, 2016 02:04 AM2016-07-23T02:04:22+5:302016-07-23T02:04:22+5:30

पदपथावरील हातगाड्या आणि दुकानांचे अतिक्रमण, नो पार्किंगमध्ये उभी केली जाणारी वाहने, खोदलेले पदपथ, रखडलेली ब्लॉक बसवायची कामे

Trouble with encroachments on the pavement | पदपथावरील अतिक्रमणांचा त्रास

पदपथावरील अतिक्रमणांचा त्रास

Next


चिंचवड : पदपथावरील हातगाड्या आणि दुकानांचे अतिक्रमण, नो पार्किंगमध्ये उभी केली जाणारी वाहने, खोदलेले पदपथ, रखडलेली ब्लॉक बसवायची कामे, केएसबी चौकातील संथगतीने सुरू असलेला उड्डाणपूल आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी असे चित्र आहे शाहूनगर-संभाजीनगर प्रभागातील. मॉडेल वॉर्ड म्हणून विकसित होत असणाऱ्या प्रभागातही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पदपथावरील अतिक्रमणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
शाहूनगर-संभाजीनगर प्रभाग क्रमांक नऊमध्ये शाहूनगर, संभाजीनगराचा प्रमुख भाग येतो. सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, नारायण बहिरवाडे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय नागरिक येथे वास्तव्यास आहेत. प्राधिकरणानंतर सुयोनियोजितपणे विकसित झालेला हा एकमेव भाग आहे. महापालिका, एमआयडीसी आणि प्राधिकरण असा संमिश्र भाग या प्रभागात येते. शाहूनगरात आरटीडीसी, एचडीएफसी या प्रमुख वसाहती आहेत; तर संभाजीनगरातही मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण सोसायट्या आहेत. कवयित्री बहिणाबाई सर्पोद्यान उद्यान आणि बर्ड व्हॅली पर्यटनाचे प्रमुख स्थळ बनले आहेत. कस्तुरी मार्केट आणि ओसिया मार्केटही या परिसरात येते. संमिश्र भाग असल्याने लोकप्रतिनिधींना विकासकामे करवून घेताना अडचणी येतात. सत्ताधारी राष्ट्रवादीची महापालिकेत सत्ता आहे, तर मंगला कदम या सत्तारूढ पक्षनेत्या आहेत. मॉडेल वॉर्ड करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रभागात निधी आणला. विकास कामांचा धडका लावला असला, तरी अर्धवट विकासकामे नागरिकांच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहेत.
प्रभागात ठिकठिकाणी पदपथांची कामे सुरू आहेत. ती अर्धवट असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. तसेच पदपथाचे काँक्रिटीकरण करून त्यावर रंगीबेरंगी ब्लॉक बसविले जात आहेत. हे ब्लॉक शहरातील अन्य कोणत्याही पदपथांवर दिसत नाहीत. अनेक ठिकाणी पदपथांचे काम अपूर्ण असल्याने राडारोडा पडल्याचे दिसून येत आहे.
महाबली चौकाकडून अष्टविनायक गणेश मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंडई भरलेली असते. या रस्त्यावर काही व्यावसायिकांनी पदपथावर दुकानाचे साहित्य ठेवले आहे. असेच चित्र अन्य रस्त्यांवरही दिसून येते. शिवशंभो चौकातून शिवमंगल सोसायटीकडे जाणाऱ्या पदपथावरही मोठ्या प्रमाणावर भाजीविक्रेते, हातगाडीवाले बसतात. त्यामुळे पदपथावरूनही चालणे कठीण झाले आहे. मंडईची सोय नसल्याने रस्त्यावरच बसावे लागते, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
पुलाचे काम अर्धवट
केएसबी चौकातून कुदळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील केसएसबी चौकातील पुलाचे काम अपूर्ण आहे. तसेच त्यासाठी रस्ताही खोदला आहे. त्यामुळे आरटीओकडे जाताना डाव्या हाताला राडारोडा तसाच पडल्याचे दिसून येते. तसेच या रस्त्यावरील बीआरटी लेनवर चारचाकी वाहने पार्क केली जातात. एमआयडीसीतील शाहूनगर, संभाजीनगर प्रभागातील अंतर्गत रस्ते प्रशस्त आहेत. मात्र, त्या रस्त्यावरील पदपथांची अवस्था तितकीशी चांगली नाही. दुरुस्तीची कामे अर्धवट आहेत. पूर्णानगरमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बेशिस्तीचे दर्शन घडते.
संभाजीनगरातील एमआयडीएससी जी ब्लॉकमधील सिद्धविनायक मंदिरासमोरील रस्त्यावरील खासगी वाहिन्या टाकणाऱ्यांनी खोदलेले आहेत. पाण्याच्या वाहिनेचे काम करण्यासाठी रस्ता खोदला आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणावर वनराई दिसून येते. रस्ता रुंदीकरणात ही झाडे तशीच ठेवलेली आहेत. (वार्ताहर)
> संभाजीनगरातील कमलनयन बजाज शाळेकडून कस्तुरी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर, थरमॅक्स चौकातून रोटरी क्लबकडे येणाऱ्या रस्त्यावरही वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. सावरकर पथ ते संभाजीनगरच्या पदपथावर दुकानदारांनी अतिक्रमणे केल्याचे दिसून येते. अर्धवट कामांमुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Trouble with encroachments on the pavement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.