नगरविकास विभाग अडचणीत
By admin | Published: August 4, 2015 01:16 AM2015-08-04T01:16:47+5:302015-08-04T02:02:22+5:30
महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांची माहिती राज्याच्या नगरविकास विभागाने दिली नसल्याचा ठपका ठेवून राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड
उल्हासनगर : महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांची माहिती राज्याच्या नगरविकास विभागाने दिली नसल्याचा ठपका ठेवून राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी विभागाच्या चौकशीसह ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकाराने शहरातील अवैध बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
उल्हासनगरात राज्य शासनाच्या अध्यादेशानंतरही हजारो अवैध बांधकामे उभी राहिली असून पालिकेने कागदावर पाडकाम कारवाई दाखविली आहे. प्रकाश कुकरेजा यांनी माहिती अधिकाराखाली नगरविकास विभाग व महापालिकेकडे अवैध बांधकामांची माहिती मागितली. मात्र, नगर विकास विभागाने उल्हासनगरातील अवैध बांधकामांची यादी उपलब्ध
नसल्याचे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी दोन वेळा अपिलात जाऊन माहितीची मागणी केली.
तेव्हा नगरविकास विभागाने अपीलकर्ता कुकरेजा यांना अवैध बांधकामांची माहिती देण्यास कमालीचा बेजबाबदारपणा दाखविल्याचा शेरा राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मारून ३० दिवसांच्या आत माहिती देण्याचे आदेश विभागाला दिले आहेत. तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी ५ हजार रुपये देण्याचे व विभागाच्या चौकशीचे आदेश नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवाला दिले आहे.
या प्रकाराने अवैध बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून बहुतांश अवैध बांधकामे नगरसेवकांचे नातेवाईक, कार्यकर्ते करीत असल्याने ते अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.