ट्युशन्समधील गैरप्रकारांना आळा घालणार
By admin | Published: April 2, 2016 01:24 AM2016-04-02T01:24:39+5:302016-04-02T01:24:39+5:30
खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, त्यांचा छळ तसेच लैंगिक अत्याचाराची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता बनविण्याचा
मुंबई : खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, त्यांचा छळ तसेच लैंगिक अत्याचाराची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता बनविण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यासाठी शिक्षणतज्ज्ञ आणि विधिमंडळातील सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली.
खाजगी क्लासेसमध्ये होणारे गैरप्रकार, सायनमधील शाळेत विद्यार्थिनीवर शिक्षकाने तर दादरमधील शाळेच्या आवारात गाडीच्या क्लीनरकडून तसेच अंधेरीतील राजहंस विद्यालयात खासगी वाहनाच्या चालकाने विद्यार्थिनीवर केलेला बलात्कार आदींबाबत भाजपाचे आमदार अमित साटम, शिवसेनेचे संजय पोतनीस आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर तावडे म्हणाले, मुंबईतील मालाड परिसरातील श्री ट्युटोरियल्समधील विद्यार्थ्यांना नग्न उभे करून शिक्षा दिली. त्याचप्रमाणे शीव येथील बालक एज्युकेशन सोसायटी, दादर येथील जनरल एज्युकेशन सोसायटी, अंधेरी येथील राजहंस विद्यालयामध्ये मुलांवर अत्याचार झाले. (विशेष प्रतिनिधी)
जनजागृतीवर भर देणार
खासगी क्लासेस अथवा शाळांमधील गैरप्रकार रोखण्याच्या दृष्टीने ‘जेंडर सेंसेटायझेशन’ निर्माण करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्रचार करण्यात येईल. शाळांमध्ये पालक-शिक्षक संघटनांच्या माध्यमातूनही जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.