त्रास फक्त गरिबांनाच
By admin | Published: November 16, 2016 05:51 AM2016-11-16T05:51:27+5:302016-11-16T05:51:27+5:30
केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचा सर्वाधिक त्रास गोरगरीब जनतेला होत असून काळा पैसा बाळगणारे विजय मल्ल्या,
मुंबई : केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचा सर्वाधिक त्रास गोरगरीब जनतेला होत असून काळा पैसा बाळगणारे विजय मल्ल्या, ललित मोदींसारखे लोक परदेशात निघून गेले, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
भिवंडी कोर्टात हजर राहाण्यासाठी मुंबईत आलेले राहुल यांनी मंगळवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. सरकारने नोटाबंदीच्या निर्णयाची माहिती भाजप नेत्यांना अगोदरच दिली होती. तसे नसते तर पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांनी आधीच पैसे डिपॉझीट कसे केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस पक्ष काळ्यापैशाविरोधात आहे. मोदींनी निर्णय घेतला त्याला आमची हरकत नाही. मात्र निर्णय घेण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक होते, असे सांगून ते म्हणाले नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हसत होते आणि नंतरच्या गोव्यातील भाषणात मात्र रडत होते. नोटांसाठी लागलेल्या रांगांमध्ये आजवर १८ लोक मेले. त्यामुळे मोदींनी हसायचे की रडायचे हे आधी ठरवावे, असा टोलाही राहुल यांनी लगावला. मोदी आणि माझ्यात खूप फरक आहे. त्यामुळेच मी त्यांच्या मातोश्री पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, असे सांगून राहुल म्हणाले, नोटाबंदीचा त्रास गरीबांनाच होत आहे. काळा पैसा बाळगणारा एकही मोठा मासा बँकांच्या रांगेत कुठेही दिसला नाही.
नोटाबंदीचा निर्णय घेताना अर्थमंत्री अरुण जेटली यांना अंधारात ठेवण्यात आले. सर्वसामान्य जनतेला आर्थिक खाईत लोटणारा निर्णय घेऊन सरकारने काय साधले, असा सवालही राहुल यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)