रोमिओंच्या स्टंटबाजीमुळे त्रास
By admin | Published: July 21, 2016 01:23 AM2016-07-21T01:23:39+5:302016-07-21T01:23:39+5:30
खेडच्या पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषत:, विद्यालये किंवा महाविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या सुमारास रोडरोमिओ जाणूनबुजून करीत असलेल्या स्टंटमुळे विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी विद्यालयाच्या वेळेत परिसरात गस्त घालण्याचे लेखी निवेदन बहुळ (ता. खेड) येथील सुभाष विद्यालयाने चाकण पोलीस ठाण्याला सुपूर्त केले आहे.
पूर्व भागातील शेलपिंपळगाव, बहुळ, भोसे, रासे, मरकळ, सोळू, आळंदी, कोयाळी आदी गावांत गाड्या विचित्र पद्धतीने चालविण्याचे प्रकार घडत आहेत. दुचाकींना वेगळ्या आणि विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसविलेले आहेत. त्यामुळे गाडीतून वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र आणि कर्कश आवाजही निघतात. ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थिनी या प्रकाराने वैतागल्या असून, बाईकवरून प्रवास करणाऱ्या तरुणींना वाहतुकीदरम्यान त्याचा त्रास होत आहे.
बाईक स्टंट करणाऱ्यांमधील काही तरुण धनदांडग्या परिवारातील असल्याने सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी होते. परिणामी, अशा घटना फोफावल्या जाऊ लागल्या आहेत. या उनाडक्या करणाऱ्या मुलांवर कारवाईचा बडगा उगारला जात नाही, असे काही नागरिकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दरम्यान, महाविद्यालयासमोर टवाळखोरांचा त्रास वाढत चालला आहे. भरधाव गाड्या चालविणे, शाळा-महाविद्यालयांच्या समोर विनाकारण चकरा मारणे तसेच शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या सुमारास विद्यार्थिनींना त्रास दिला जात आहे. ज्या रस्त्याचा युवती शाळेत ये-जा करण्यासाठी वापर करतात, त्या ठिकाणी टवाळखोरांच्या टोळ्या बाईक घेऊन बसलेल्या असतात.
बाईकचा कर्कश हॉर्न किंवा सायलन्सरचा विशिष्ट आवाज करून विद्यार्थिनींचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. परिणामी, विद्यार्थीनींना खाली मान घालून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. शालेय विद्यार्थिनींना त्रास होत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवून टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
>ज्येष्ठांना नाहक त्रास
महाविद्यालयांसमोर चकरा मारून विद्यार्थिनींना नाहक त्रास देणारे रोडरोमिओ बुलेट दुचाकीचा सर्रास वापर करीत आहेत.
सायलेन्सर आणि हॉर्नचा कर्कश आवाज केला जातो. तसेच, सायलेन्सरमधून फटाक्याच्या आवाजाचा बार काढला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास होऊ लागला आहे.
>रोडरोमिओंच्या त्रासाला शाळेतील कोणीही बळी पडू नये, या उद्देशाने आम्ही विद्यालयाच्या वतीने चाकण पोलिसांना निवेदन दिले आहे. महाविद्यालयीन वेळेत पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी आम्ही केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही मागणी केली आहे.
- पौर्णिमा चव्हाण,
प्राचार्या, बहुळ