ट्रकने १२ वाहने उडविली, तीन ठार
By admin | Published: July 21, 2016 05:21 AM2016-07-21T05:21:38+5:302016-07-21T05:21:38+5:30
अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले.
चांदूरबाजार (अमरावती) : अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले. ही घटना चांदूरबाजार ते खरवाडी मार्गावर बुधवारी सायंकाळी घडली
किशोर इंगळे (४०), त्यांची पत्नी शिल्पा (३८) आणि मुलगा शौर्य (६) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी खारवाडी येथे ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला. तर, पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. राज्य राखीव दलाची तुकडी देखील घटनास्थळी दाखल झाली. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. व त्यांनी खारवाडी गावात डेरा टाकला. यात ट्रकचालक व दोन क्लिनरही जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांना ट्रकच्या कॅबिनमध्येच बसवून ठेवले होते.
हा ट्रक मोर्शी मार्गावरून अमरावतीकडे जनावरे घेऊन जात होता. जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याने ट्रक आडमार्गाने जात होता. बेदरकारपणे ट्रक चालविणाऱ्या चालकाला रोखण्याचा प्रयत्न चांदूरबाजार येथे काही नागरिकांनी केला. पण तेथून निसटताना चालकाचे नियंत्रण सुटले. पहिल्यांदा त्याने एका कारला जोरदार धडक दिली. त्यात कारचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर समोरून येणाऱ्या एसटीलाही धडक दिली. पुढे हा ट्रक तब्बल नऊ दुचाकींना धडक देत खारवाडीच्या दिशेने गेला. हे सर्व घडेपर्यंत चांदूरबाजारमधील शेकडो नागरिकांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. भ्रमणध्वनीवरून खारवाडी गावाकऱ्यांना हा ट्रक अडविण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी हा ट्रक खेड, उदखेड, कोळविहिर या गावांमध्ये देखील अडविण्याचा प्रयत्न झाला. अखेर खारवाडीत नागरिकांनी ट्रक रोखला. ट्रकमध्ये असलेल्या गायींपैकी काही गायी मृत पावल्या होत्या. जिवंत गायींना नागरिकांनी चारा-पाण्याच्या सोईसाठी सुरक्षित स्थळी हलविले.
संताप अनावर झाल्याने ट्रक पेटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. घ्पोलिसांनी बळाचा वापर केला. (प्रतिनिधी)