वाहतूक पोलिसाच्या अंगावर बुथसह घातला ट्रक
By Admin | Published: June 10, 2017 09:09 PM2017-06-10T21:09:43+5:302017-06-10T21:09:43+5:30
व्ही आय.पींच्या ताफ्यामुळे बराचवेळ वाहतूक थांबवल्याचा राग मनात धरून एका ट्रकचालकाने ट्रॅफिक बुथवर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसाला बुथसह उडवले.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 10 - व्ही आय.पींच्या ताफ्यामुळे बराचवेळ वाहतूक थांबवल्याचा राग मनात धरून एका ट्रकचालकाने ट्रॅफिक बुथवर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसाला बुथसह उडवले. या घटनेत वाहतूक शाखेचे पोलीस नाईक दत्तात्रेय दिनकर सानप गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास बीड बायपास रोडवरील गोदावरी टी पॉर्इंट येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जड वाहनांच्या वर्दळीमुळे बीड बायपास रस्त्यावर सतत अपघात घडत असतात. यामुळे या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विविध चौकात वाहतूक सिग्नल बसवले आहेत. बीड बायपास परिसरातील एका हॉटेलमध्ये शनिवारी आयोजित विवाह सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक व्ही.आय.पी. शनिवारी शहरात आले होते.
बीड बायपास रोडवरील गोदावरी टी पॉर्इंट येथे शनिवारी सकाळपासूनच पोलीस उपनिरीक्षक माणिक चौधरी, नाईक दत्तात्रय सानप यांच्यासह सहा कर्मचा-यांची ड्युटी लावण्यात आली होती. सानप हे दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास वाहतूक बुथवर उभे राहून वाहतूक नियमन करत होते. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या वाहनांचा ताफा गोदावरी टी पॉर्इंट येथून जाणार असल्याची माहिती मिळताच पोलीस नाईक सानप यांनी देवळाईकडून महानुभाव आश्रम पोलीस चौकीकडे जाणारी आणि एमआयटीकडून देवळाई चौकाकडे जाणारी सर्व वाहने थांबवली.
केवळ संग्रामनगर उड्डाणपुलाकडून येणारी-जाणा-या व्हीआयपींच्या वाहनांचा वाहनांचा रस्ता मोकळा ठेवला. यावेळी देवळाई चौकाकडून महानुभाव आश्रम पोलीस चौकीकडे जाण्यासाठी ट्रक (क्रमांक टीएन २९एएच ६११२)थांबलेला होता. बराचवेळ थांबवल्यामुळे ट्रकचालकास पोलीस नाईक सानप यांचा राग आला. यावेळी अचानक त्याने ट्रक सुरू केला आणि सानप उभे असलेल्या ट्रॅफिक बुथला त्याने जोराची धडक देऊन तो सुसाट पुढे निघाला. या धडकेत बुथसह सानप रस्त्यावर खाली पडले.
सानप यांचे हात बुथच्या खाली दबले गेले आणि त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. काही पोलीस सानप यांच्या मदतीसाठी धावले तर उर्वरित पोलिसांनी पाठलाग करून पळून जाणा-या ट्रकला अडवून चालक त्यागराजन एम(रा. मुथ्यूस्वामी नमकलम, तामिळनाडू)याला पकडले. पोलिसांनी सानप यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सानप यांच्या तक्रारीवरून सातारा ठाण्यात ट्रकचालक त्यागराजन विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.