कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा ट्रक पेटविला, २९ मृत ११ जिवंत गुरांना काढले बाहेर
By admin | Published: June 14, 2016 04:43 PM2016-06-14T16:43:02+5:302016-06-14T16:43:02+5:30
गुरे घेऊन जाणारा ट्रक जमावाने अडवून त्याची तोडफोड केली तसेच त्यास जाळल्याची घटना चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ : गुरे घेऊन जाणारा ट्रक जमावाने अडवून त्याची तोडफोड केली तसेच त्यास जाळल्याची घटना चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने जमावाने केलेल्या दगडफेकीत चार पोलीस अधिकारी जखमी झाले.
सोमवारी सकाळी ११.३० वाजेनंतर तब्बल पाच तास हा प्रकार सुरू होता. दगडफेकीत सहायक पोलीस निरीक्षक आर. एन. पवार, अडावदचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, चोपडा शहराचे सहायक फौजदार वसंत चव्हाण, किरण पाटील हे जखमी झाले आहेत.
धरणगावहून यावलकडे जाणाऱ्या ट्रकमधून गुरांची वाहतूक केली जात होती.
ट्रकचे टायर फुटल्यानंतरही बिंग फुटेल म्हणून चालकाने ट्रक तसाच चालविला. मात्र चोपड्यातील हतनूर पाटचारीजवळ काही महाविद्यालयीन तरूणांना संशय आला. त्यांनी ट्रकचा पाठलाग करून तो यावल रस्त्यावर अडविला. तेथून ट्रक बाजार समितीच्या आवारात नेण्यात आला. संतप्त जमावाने ट्रक चालक, क्लिनरला बेदम मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून दोघांची सुटका केली.
जमावाने ट्रकची ताडपत्री काढल्यानंतर त्यात तब्बल ४० गुरे कोंबलेली होती. त्यात २९ जनावरे मृत आढळून आली. गुरांचा ट्रक पकडल्याचे वृत्त पसरताच बाजार समिती आवारात हजारोंचा जमाव एकत्र आला.
पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांनी जमाव पांगविण्याचे आदेश दिले होते. रात्री उशिरापर्यंत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.