मेटे अपघातप्रकरणी ट्रक चालक ताब्यात, पालघर पोलिसांची दमणमध्ये कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 09:11 AM2022-08-16T09:11:49+5:302022-08-16T09:12:15+5:30
Vinayak Mete : रायगड पोलिसांच्या माहितीवरून पालघर पोलिसांनी दमण येथून चालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती अपघाताचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे, मात्र कोणासही अटक केलेली नसून गुन्हाही दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अलिबाग : शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर रसायनी (जि. रायगड) येथील अपघातात मृत्यू झाला. मेटे यांच्या अपघातानंतर अनेक शंका उपस्थित झाल्याने त्यांच्या गाडीची धडक झालेल्य़ा ट्रकच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. रायगड पोलिसांच्या माहितीवरून पालघर पोलिसांनी दमण येथून चालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती अपघाताचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे, मात्र कोणासही अटक केलेली नसून गुन्हाही दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मेटे यांचा अपघातात मृत्यू झाला असून, चालक आणि सुरक्षा रक्षक पोलीस जखमी आहेत. रायगड हद्दीत हा अपघात झाल्याने अपघाताबाबत शोध घेण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मेटे यांचे वाहन हे समोरील ट्रकवर आदळून अपघात झाला होता, मात्र घटनास्थळी ट्रक नसल्याने या ट्रकचा आणि चालकाचा शोध घेणे आवश्यक होते. यासाठी रायगड पोलिसांनी सूत्र हलवून ट्रक दमणमध्ये असून, ट्रक मालक कासा (डहाणू, पालघर) येथील असल्याची माहिती मिळवली. पालघर पोलिसांशी संपर्क करून त्यांना माहिती दिल्यानंतर पालघर पोलिसांनी ट्रक मालकाला विश्वासात घेऊन चालकाची माहिती घेतली. त्यानुसार पालघर पोलिसांच्या पथकाने दमण येथून ट्रक आणि चालकास ताब्यात घेतले आहे.