तीच आपली अन् आपल्या मातीची खरी ओळख, सयाजी शिंदेंची 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 14:44 IST2020-05-31T14:41:10+5:302020-05-31T14:44:42+5:30
अभिनेते सयाजी शिंदे आणि कथा लेखक अरविंद जगताप यांच्या सह्याद्री देवराईने आता लुप्तप्राय झालेल्या देशी आंब्यांच्या विविध प्रजाती गोळा करून त्या लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

तीच आपली अन् आपल्या मातीची खरी ओळख, सयाजी शिंदेंची 'मन की बात'
मुंबईः कोरोनाच्या संकटामुळे देशात टाळेबंदी आहे. अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. मुंबईकरही कोरोनाच्या भीतीपायी गावी जाण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. गावी निसर्गाच्या सान्निध्यात आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात अनेकांना प्रसन्न वाटतं. पण तो निसर्गाचा ठेवा जपण्याकडे फारसं कोणी गांभीर्यानं पाहत नाही. अभिनेते सयाजी शिंदे नेहमीच निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपण्यासाठी प्रयत्नशील असतात. आपापल्या परीनं ते सर्व वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी अग्रेसर असतात. अभिनेते सयाजी शिंदे आणि कथा लेखक अरविंद जगताप यांच्या सह्याद्री देवराईने आता लुप्तप्राय झालेल्या देशी आंब्यांच्या विविध प्रजाती गोळा करून त्या लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. १२ जूनपर्यंत आंब्याच्या विविध प्रजातींच्या कोयी संकलित करण्यात येणार असून त्याची रोपे तयार करून लावण्यात येणार असल्याचंही सयाजी शिंदे यांनी पत्रकार आणि लेखक असलेल्या अभयकुमार देशमुख यांना सांगितलं आहे.
आपली संस्कृती जपायची म्हणजे निबंध नसतात जपायचे. किंवा मेसेज नसतात फॉरवर्ड करायचे. आपली अस्सल झाडं जपायची असतात. ती आपली आणि आपल्या मातीची खरी ओळख असते. मग या महिन्यात जेवढ्या वेगवेगळ्या देशी आंब्याच्या कोयी गोळा करता येतील त्या करा. जपून ठेवा. सह्याद्री देवराईचे तुमच्या भागातले वृक्षमित्र त्या गोळा करण्याची जवाबदारी घेतील. अर्थात फक्त कोय द्यायची नाही. तिची माहिती द्यायची. कोय कोणत्या प्रकारची आहे? त्या आंब्याला तुमच्या भागात काय म्हणतात? आंबा कुणी लावला होता हे माहित असलं तर उत्तम. ज्याचं श्रेय त्याला द्यायला पाहिजे. आणि ही झाडं लावणाऱ्या माणसांची नावं जगाला कळायला पाहिजेत, असा उद्देश असल्याचंही सयाजी शिंदे म्हणाले आहेत.
शेकडो वर्षांपासून उन्हाच्या झळा सोसणारी माणसं आपण. हे सगळं उन फक्त झाडांच्या जीवावर सोसत आलोय आपण आणि आपले पूर्वज. त्यातही एका झाडाची सावली उन्हाळ्यात जास्तच गोड वाटते. बरोबर ओळखलं. आंब्याचं झाड. दुर्दैवाने नव्या पिढीला आंब्याच्या अस्सल देशी जाती माहितही होत नाहीत. खायला मिळणे तर खूप लांबची गोष्ट. शेप्या, लालपरी, गोटीआंबा, रायवळ, खारीकआंबा, कागद्या, लोणच्या, केसर, शेंदरया, नारळया, बिटका, केळ्या, गाडग्या अशी कितीतरी नावं होती आपल्या लहानपणी. यातल्या ठराविक झाडाच्या कैऱ्यांचाच खार व्हायचा. तुम्ही म्हणाल नारळ्या आणि खोबऱ्या एकच. पण तसं नाही. नारळ्या आकाराने नारळाएवढा असतो. तर खोबऱ्या चवीला खोबऱ्यासारखा असतो. हे सगळं आपलं वैभव होतं. कमी तेल वापरून मुरलेला खार अजूनही जिभेवर आहे. त्याला सुटलेलं पाणी भाकरीला घोळसून खाण्यात काय मजा होती. या सगळ्या आठवणी राहिल्यात, याचीही आठवण सयाजी शिंदे यांनी करून दिली आहे.
३० मेपर्यंत सर्व आंब्यांच्या कोयी गोळा करून ८ जूनपर्यंत त्या वाळवण्यात येणार आहेत. तसेच १२ जूनपर्यंत त्या कोयी संकलित करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी काही वृक्षप्रेमींचे नंबरही दिले आहेत. खाली दिलेल्या नंबर वर आपल्या वृक्षप्रेमी मित्रांना संपर्क करा. कोयीची माहितीही द्यायची आहे. कोय कोणत्या प्रकारची? त्या आंब्याला तुमच्या भागात काय म्हणतात? आंबा कुणी लावला होता? ही झाडं लावणाऱ्या माणसांची नावं जगाला कळायला पाहिजेत. सुहास वाईंगनकर : ९४२१२९०११२, विजय निंबाळकर : ८२७५३६९३८३, धनंजय शेडबाळे : ९८२२३९४६७० आणि रघुनाथ ढोले : ९८२२२४५६४५ या वृक्षमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.