न्यायपथावर चालणे हीच खरी पत्रकारिता
By Admin | Published: December 20, 2015 02:08 AM2015-12-20T02:08:28+5:302015-12-20T03:48:49+5:30
कितीही दबाव आला आणि मृत्यू जरी समोर दिसत असला तरी अखेरपर्यंत न्यायाचीच भूमिका घेणारा खरा पत्रकार असतो. यामुळे प्रशासनासहित समाजालाही लाभ मिळतो. लोकशाहीचे
कितीही दबाव आला आणि मृत्यू जरी समोर दिसत असला तरी अखेरपर्यंत न्यायाचीच भूमिका घेणारा खरा पत्रकार असतो. यामुळे प्रशासनासहित समाजालाही लाभ मिळतो. लोकशाहीचे तीन स्तंभ न्यायव्यवस्था, प्रशासन आणि शासन यांच्यावर दबाव आणणारा, प्रेरित करणारा, प्रसन्न करणारा, प्रशंसा करणारा लोकशाहीचा स्तंभ प्रेस आहे. त्यामुळे लोकशाहीत या तीनही स्तंभांना प्रभावित करणारा हा महत्त्वाचा स्तंभ आहे, असे मत कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी वेदप्रताप वैदिक यांचा परिचय लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र यांनी करून दिला. प्रसारमाध्यमांचे काम बातमी देणे आहे. ही प्रक्रिया अखंड सुरू असते. लोकशाहीचे इतर तीन स्तंभ सुटी घेऊ शकतात, पण पत्रकारितेला अविश्रांत काम करणे आवश्यक आहे. सारे शरीर झोपले तरी हृदयाचे काम अखंड सुरू असते. त्याप्रमाणेच पत्रकारितेचे आहे. एक तासही बातम्यांचे चॅनेल, रेडिओ आणि वृत्तपत्रांचे काम बंद झाले तर समाजात अफवा पसरतील आणि सामाजिक सलोखा बिघडेल. त्यामुळेच हा स्तंभ सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कोट्यवधी लोक एकाच वेळी एखादी बातमी ऐकतात, पाहतात. लोकमतही लाखो लोक एकाच वेळी वाचतात. त्यामुळे माध्यमांच्या बातम्या ईश्वरवाणीसारख्या आहेत. सरकार आणण्याची आणि पाडण्याची शक्ती माध्यमांमध्ये आहे. त्यामुळेच पत्रकारिता निष्पक्ष आणि सत्याधारित असली पाहिजे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची पत्रकारिता अपरिपक्व आहे. केवळ वाद निर्माण करणे आणि निर्णयाप्रत न पोहोचण्याचे काम ही माध्यमे करीत आहेत. त्यातुलनेत प्रिंट माध्यमे परिपक्व आहेत. पत्रकारिता हा साधा सौदा नाही.
हा विचारांचा व्यवसाय आहे. यात अणुबॉम्बपेक्षा अधिक शक्ती आहे. एखादा अविचार विनाशकारीही असतो. त्यामुळे निकोप समाजनिर्मिती आणि राष्ट्रनिर्माणाच्या विचारातच मोठी शक्ती असते, असे ते म्हणाले.