खुद्द ट्रम्प उतरले जिल्ह्याच्या निवडणुकीत!

By Admin | Published: February 16, 2017 03:04 AM2017-02-16T03:04:09+5:302017-02-16T03:04:09+5:30

निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची असते हे खरं; पण बारामतीतल्या एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उतरलेले दिसले तर?...

Trump landed in the district elections! | खुद्द ट्रम्प उतरले जिल्ह्याच्या निवडणुकीत!

खुद्द ट्रम्प उतरले जिल्ह्याच्या निवडणुकीत!

googlenewsNext

बारामती : निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची असते हे खरं; पण बारामतीतल्या एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उतरलेले दिसले तर?... किंवा टायटॅनिक चित्रपटाचा हिरोच आपल्याला कोणाला मत द्यायचे हे सांगू लागला तर?... सध्या अशाच नानाविध क्लृप्त्या लढवून लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी उमेदवारांनी अनोखी शक्कल लढवलेली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध फंडे शोधले जात आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाची रणधुमाळी सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध फंडे शोधत आहेत. त्यामधून अमेरिकेचे अध्यक्ष, हॉलिवूड अभिनेत्यांना अप्रत्यक्ष सहभागी करून घेतले आहे. शिवाय बहुचर्चित सैराटच्या कलाकारांसह शांताबाईच्या तालावरील प्रचार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे. मतदारांसाठी हा प्रचार औत्सुक्याचा, कौतुकाचा विषय ठरला आहे.
जीआयएफ फाइलद्वारे असे व्हिडिओ दिसत असल्याने व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर ते अल्पावधीत व्हायरल झालेले दिसून येत आहेत. हे व्हिडिओ करण्यासाठी स्थानिक पातळीवरही यंत्रणा कार्यान्वित झाली असल्याचे दिसून येत आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या विविध निर्णयाने चर्चेत नेहमीच येतात. मात्र, चक्क जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत ट्रम्प यांनीदेखील लक्ष वेधून घेतले आहे.
एका बैठकीत ‘व्होट फ ॉर’ असा फलक दाखवून संबंधित पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ ‘व्हायरल’ झाला आहे. सोशल मीडियावर तो व्हिडिओ पोस्ट केला जात आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना निवडणुकीच्या प्रचारात सहभागी करून घेण्याचा हा फंडा भलताच लोकप्रिय ठरला आहे.
याशिवाय काही वर्षांपूर्वी हॉलिवूडच्या त्या काळात गाजलेल्या ‘टायटॅनिक’ चित्रपटातील अभिनेता जॅक डॉवसन — अभिनेत्री केंट विन्स्लेंट दरम्यानच्या संवादाला पक्षप्रचाराचे स्वरूप देण्यात आले आहे. अभिनेता टेबलवर बसलेल्या अभिनेत्रीला चिठ्ठी देतो. त्या वेळी दिलेल्या चिठ्ठीमध्ये आमच्या पक्षाला मतदान करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सैराट चित्रपटातील एका प्रसंगाचादेखील प्रचारासाठी वापर करण्यात आला आहे. या चित्रपटातील सहायक अभिनेत्री घराच्या माडीतून खाली चिठ्ठी टाकते. त्यामुळे ती चिठ्ठी आपल्यासाठीच आहे, या समजातून बाळ्या ती
चिठ्ठी त्यांच्या ढंगात उचलतो. त्या चिठ्ठीतून मतदारांची झालेली फसवणूक संवादाद्वारे मांडण्यात आली आहे. ‘मोठ्या अपेक्षेने
गेलेल्या बाळ्याची फसगत झालेली पाहून परश्या आणि सल्या त्याला हसतात. या प्रसंगाद्वारे प्रचार करण्यात आला आहे. हा प्रसंग देखील मतदांरामध्ये हशा निर्माण करणारा ठरला आहे.
शांताबाई..आमच्या उमेदवाराला तोडच नाही!
याशिवाय शांताबाईचे गाणेदेखील लक्ष वेधून घेत आहे. आमच्या उमेदवाराचा प्रभाव पाहिलाय का तुम्ही.. अहो शांताबाई म्हणते आमच्या प्रभागात नाहीच काही कमी..आमचे उमेदवार असे मजबूत क ार्यकर्ते आहेत...ज्यांच्या येण्याने विरोधकांची छाती धडधडू लागते.. शांताबाई..शांताबाई..आमच्या उमेदवाराला तोडच नाही.. शांताबाई शांताबाई.. आपला माणूस साधा माणूस..आलेत शंभर गेलेत शंभर..आमचे उमेदवार न हालले कणभर.. कार्य धुरंधर..कार्य निरंतर..उमेदवार आमचे एकच नंबर..एकच नंबर..एकच नंबर आमच्या उमेदवाराला तोडच नाय..शांताबाई.. या गीतावरील ‘शांताबाई फेम’ गाण्याने चांगलाच जोर धरला आहे. प्रचाराचे हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले आहे. उमेदवार या गाण्यासाठी प्रचाराचा आग्रह धरत आहेत.
...ए परश्या, जाऊन सांग तुझ्या आर्चीला
याशिवाय फितूर झाले कितीतरी आम्ही झुंज घेणार, ए परश्या जाऊन सांग आर्चीला आमचाच उमेदवार निवडून येणार....नेते नाहीत.. सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस आहे. आपले मत कोणाला, साथ जनतेची प्रगती सर्वांची. ताई माई अक्का..आमच्या चिन्हावर मारा शिक्का, असे आदी ‘डायलॉग’द्वारे आवाहन सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी गाजलेल्या चित्रपटातील संवादाचा वापर सुरू आहे.

Web Title: Trump landed in the district elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.