रायगडावरून फुंकली तुतारी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन निवडणूक चिन्हाचे थाटामाटात अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 06:14 AM2024-02-25T06:14:25+5:302024-02-25T06:14:40+5:30
शरद पवार हे चाळीस वर्षांनी किल्ले रायगडावर आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : निवडणूक आयोगाने बहाल केलेले तुतारी चिन्ह संघर्षाची सुरुवात करण्यासाठी प्रेरणादायी आहे. सामान्यांच्या पाठिंब्यातून यश मिळवून जनतेची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळेल, असा आत्मविश्वास नेते शरद पवार यांनी बोलून दाखविला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षातर्फे तुतारी चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, खा. फौजिया खान, आ. जितेंद्र आव्हाड, आ. वंदना चव्हाण, आ. सुमन पाटील, आ. प्रसाद तनपुरे, अनिल तटकरे उपस्थित होते.
सामान्य माणसांत आत्मविश्वास वाढवण्याची कामगिरी शिवछत्रपतींनी त्या काळात केली व त्यामधूनच हे राज्य उभे राहिले. त्यादृष्टीने तुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, असेही शरद पवार म्हणाले.
४० वर्षांनी रायगडावर
शरद पवार हे चाळीस वर्षांनी किल्ले रायगडावर आले होते. रोपवेने ते किल्ले रायगडवर आल्यानंतर त्यांना पालखीतून राज सदरेवर आणण्यात आले. यावेळी शरद पवार यांच्यासह खासदार, आमदार यांनी भगवे फेटे परिधान केले होते. किल्ले रायगडावर भगवामय वातावरण झाले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या हातात तुतारी हे पक्ष चिन्ह दिले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनीही तुतारी वाजवून रणशिंग फुंकले.
मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, ४० वर्षांनंतर शेवटी शरद पवार रायगडावर गेले. अजित पवारांना याचे श्रेय द्यावेच लागेल. अजित पवार यांच्यामुळेच अखेर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करण्यासाठी जावे लागले, याचा आनंद वाटतो. त्यामुळे आता तुतारी कुठे, कशी वाजते? हे भविष्यात दिसेलच.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री