सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 06:50 AM2024-10-04T06:50:51+5:302024-10-04T06:51:00+5:30
‘अ’ आणि ‘ब’ वर्गांतील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकललेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिला आहे. त्यानुसार राज्यातील २९ हजार ४४३ सहकारी संस्थांची निवडणूक होईल, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी दिली.
सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्य सरकारच्या आदेशानुसार ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर पुढे ढकलल्या आहेत, त्या टप्प्यानुसार १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. ‘अ’ आणि ‘ब’ वर्गांतील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.
सुधारित यादी कार्यक्रम राबवावा
n‘क’ वर्गातील ज्या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम मतदारयादी प्रसिद्धीनंतर पुढे ढकललेला आहे, अशा संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाला तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांची मान्यता घेण्यात यावी.
nज्या सहकारी संस्थांची मतदारयादी अंतिम करण्याचा कार्यक्रम ज्या टप्प्यावर पुढे ढकललेला आहे, त्या टप्प्यापासून पुढे सुधारित यादी कार्यक्रम राबवावा.
nज्या संस्थांना जिल्हा, तालुका, प्रभाग निवडणूक अधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे प्राधिकरणाने अर्हता दिनांक दिला आहे, अशा संस्थांच्या मतदारयाद्या त्या अर्हता दिनांकावर तयार करून निवडणूक प्रक्रिया राबवावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
‘अ’ वर्ग ४२
‘ब’ वर्ग १,७१६
‘क’ वर्ग १२,२५०
‘ड’ वर्ग १५,४३५
ज्या संस्थांच्या मतदारयाद्या अद्याप प्रसिद्ध केलेल्या नाहीत, अशा याद्या तयार करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२४ हा अर्हता दिनांक देण्यात आला आहे.