इंदोरीकर महाराजांची एखादी चूक असती तर त्यांना माफ केलं असतं :तक्रार देण्यावर तृप्ती देसाई ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 01:31 PM2020-02-18T13:31:47+5:302020-02-18T14:16:19+5:30
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करूनही या प्रकरणावर पडदा पडलेला नाही. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई याबाबत अहमदनगरच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्यावर ठाम असून थोड्याच वेळात त्या नगर येथे पोहोचतील.
पुणे : निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करूनही या प्रकरणावर पडदा पडलेला नाही. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई याबाबत अहमदनगरच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्यावर ठाम असून थोड्याच वेळात त्या नगर येथे पोहोचतील.
याबाबत अधिक माहिती अशी की, ५ फेब्रुवारीच्या कीर्तनातील निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याबाबत समर्थक आणि विरोधक यांचे अक्षरशः शाब्दिक युद्ध पेटले आहे. याच विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही कारवाईची मागणी केली आहे. याच विषयावर देसाई यांनी इंदोरीकर यांच्या विरोधात भूमिका घेतली असून त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलही होत आहेत. या सगळ्याबद्दल तक्रार देण्यासाठी त्या नगरला निघाल्या आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना देसाई यांनी सांगितले की, 'देशमुख यांचे वक्तव्य चुकीचे असून पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार हा गुन्हा आहे. मी यावर बोलल्यावर त्यांचे समर्थक धमक्या देत असून चारित्र्यहनन करत आहेत. म्हणून नगरच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यास सांगणार आहे. या विषयावर अनेक राजकारणी त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल होईल की नाही माहिती नाही मात्र त्यांना पाठीशी घातले तर येणाऱ्या अधिवेशनात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना धारेवर धरलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला. त्यांची वादग्रस्त व्यक्तव्ये आणि महिलांची चपलेशी तुलना बघून आम्ही त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.