Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले नाहीत, अजून उंच भरारी मारण्यासाठीचं बळ”: तृप्ती देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 07:53 PM2022-07-02T19:53:39+5:302022-07-02T19:54:45+5:30
Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करत सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळ अचंबित झाले. यानंतर यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, यातच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत, त्यांची बाजू घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेसह ५० आमदारांना सोबत घेऊन भाजपचा हात धरत राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रिपदाची घोषणा करताना देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर आपण सत्तेबाहेर राहणार असे स्पष्ट केले. मात्र शपथविधीला काही मिनिटे राहिलेली असतानाच थेट भाजप पक्षश्रेष्ठी अमित शाह आणि जेपी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली. अखेर पक्षाच्या आदेशामुळे फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. यावरून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. तृप्ती देसाई यांनी मात्र फडणवीस यांची बाजू घेतली आहे.
देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले नाहीत
तृप्ती देसाई यांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये तृप्ती देसाई म्हणतात की, देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर अजून उंच भरारी मारता यावी, यासाठी हा केलेला प्रयोग आहे. मुख्यमंत्री पदावर असल्यावर त्यांना नगरपालिका निवडणुकीत विशेष लक्ष देता येणार नाही, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
दरम्यान, ३ आणि ४ जुलै रोजी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंसोबतचे सर्व बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. यानंतर ते भाजपच्या नेत्यांसह ताज हॉटेलमध्ये राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ४ जुलै रोजी शिंदे सरकार बहुमत चाचणीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले जात आहे.