महिलाच नव्हे तर पुरुषांनाही वाटतो भरोसा
By admin | Published: March 7, 2017 10:43 PM2017-03-07T22:43:06+5:302017-03-07T22:43:06+5:30
संशय आणि गैरसमजामुळे दुरावलेल्या दाम्पत्याला पुन्हा एकत्रित आणून त्यांचा संसार सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहे
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 7 : संशय आणि गैरसमजामुळे दुरावलेल्या दाम्पत्याला पुन्हा एकत्रित आणून त्यांचा संसार सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहे. दोन महिन्यात अशाप्रकारे ५५ विस्कळीत संसाराची पुन्हा घडी बसविण्यात यश आले. केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनाही न्याय देण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे पतीपीडित महिलाच नव्हे तर पत्नीपीडित पुरुषांनाही आता भरोसाचा आधार वाटू लागला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पत्रकारांना दिली.
पीडित महिला-मुलींना न्यायासाठी इकडेतिकडे फिरावे लागू नये, त्यांची हेळसांड होऊ नये आणि त्यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत मिळावी या उद्देशाने नागपुरात १ जानेवारीपासून भरोसा सेल सुरू करण्यात आला. हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरू झालेल्या भरोसा सेलच्या कार्याचा आढावा पोलीस आयुक्तांकडून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आला. यासंबधांने आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि उपायुक्त ईशू सिंधू यांनी भरोसा सेलच्या कामगिरीची माहिती पत्रकारांना दिली. भरोसाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक शुभदा संख्ये म्हणाल्या की, फेब्रुवारीअखेरपर्यंत आमच्याकडे एकूण ३७० प्रकरणे आली.
त्यातील ३१६ महिला तर, ५४ प्रकरणांत पुरुष तक्रारदार आहेत. यापैकी ५५ प्रकरणांत समेट घडवून आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. दुरावलेली मने एकत्रित आल्याने त्यांचे संसार पुन्हा सुरळीत झाले आहेत. ५४ प्रकरणांत पत्नीपीडित पुरुषांना न्याय देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात संरक्षण अधिकारी, विधी अधिकारी आणि समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या माहिलांनी पत्रकारांना काही उदाहरणे सांगितली.
संगीता ढोमणे
(संरक्षक)
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दाम्पत्याचे १४ वर्षांपूर्वी लग्न झाले. मात्र, या दोघांमध्ये विसंवाद वाढल्याने पतीने पत्नीला एक रुपयाही देणे बंद केले. परिणामी पत्नी आणि मुलांची हेळसांड सुरू झाली. प्रकरण पुरते बिघडले असताना भरोसा सेलमध्ये आले. संबंधित महिलेच्या पतीला बोलवून त्याचे समुपदेशन करण्यात आले. त्याला त्याची चूक उमगली. त्याने ती मान्य केली. आता सर्व ठीक झाले.
प्रेमलता पाटील
(समुपदेशक, मातृ सेवा संघ)
समाजाचा विरोध झुगारून त्या दोघांनी प्रेमविवाह केला. ती रोजगारावर होती. यामुळे तिने घरसंसार चालवितानाच त्याला शिकविले अन् रोजगारावर लागण्यास मदत केली. पाच वर्षे निघून गेली. त्याला नोकरी लागली. अन् त्याच्या मोबाईलवर येणा-या मेसेजमुळे ती हादरली. तो घरी खर्च करण्याऐवजी तिच्यावरच सर्व पगार उधळत असल्याचे तिच्या लक्षात आले. वाद वाढला अन् दोोघांची ताटातुट झाली. प्रकरण भरोसात आले. दोघांकडून माहिती घेतल्यानंतर तो दोषी नाही. तर, त्याला त्याच्यासोबत काम करणारी मैत्रीण ब्लॅकमेल करीत असल्याचे लक्षात आले. हा प्रकार त्याच्या पत्नीच्या निदर्शनास आणून देतानाच मैत्रीणीचाही बंदोबस्त झाला अन् या दोघांचा विस्कटू पाहणारा संसार वाचला.
संगीता चौधरी
(समुपदेशक)
सधन घरातील जबलपूरची मुलगी शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात पाचपावलीत राहत होती. तिच्यापेक्षा वयाने तीन वर्षे मोठी असलेल्या मित्रासोबत ती लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये राहत होती. दोघांची समजूत काढण्याचे पालकांनी बरेच प्रयत्न केले. शेवटी ऐकत नसल्याने लग्न लावून दिले. तीन वर्षे झाल्यानंतर आता तो अचानक बेपत्ता होतो. त्याच्यावरचा विश्वास उडाल्याने ती कोलमडली आहे. ती आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना भरोसा सेल मध्ये तिचे प्रकरण आले. तीचे योग्य समुपदेशन झाल्यामुळे आता ती सावरली. चुकीची जाणीव होतानाच आपण आता ठोस भूमिका घेण्याची गरज तिला पटली आहे.
---