संविधानाची सत्यप्रत केली जतन!
By admin | Published: November 26, 2015 03:19 AM2015-11-26T03:19:46+5:302015-11-26T03:19:46+5:30
जगभरात आदर्श ठरलेले भारताचे संविधान आणि त्याविषयी असलेले कुतूहल अनेकांसाठी संशोधनाचा विषय आहे. अनेकांकडे पुस्तक रुपाने संविधानाची प्रत असते
राजकुमार जोंधळे, लातूर
जगभरात आदर्श ठरलेले भारताचे संविधान आणि त्याविषयी असलेले कुतूहल अनेकांसाठी संशोधनाचा विषय आहे. अनेकांकडे पुस्तक रुपाने संविधानाची प्रत असते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ताक्षरातील देशाच्या संसदेमध्ये जतन करून ठेवलेल्या मूळ संविधानाच्या प्रतीची सत्यप्रत (फोटोकॉपी) मिळवून मुरुड येथील संभाजी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश वाघमारे यांनी ती प्राणपणाने जतन करुन ठेवली आहे.
वाघमारे यांनी आपल्याकडेही सत्यप्रत असावी, यासाठी थेट दिल्ली गाठून महत्तप्रयासाने मिळविली. डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या निर्मितीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. बाबासाहेबांनी राज्यघटना स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिली. बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील राज्यघटना म्हणजे जणू इतिहाातील अमूल्य ठेवा. त्यांच्या हस्ताक्षरात साकारलेली राज्यघटना आपल्या देशाच्या संसदेत ठेवण्यात आली आहे. मूळ प्रत आणणे शक्य नाही. परंतु किमान याची सत्यप्रत तरी आणता येईल, या विचाराने ते प्रेरित झाले.त्यांनी गाठीभेटी आणि विविध परवानगी घेण्यास सुरूवात केली. १९७९ मध्ये त्यांनी थेट रामविलास पासवान यांची भेट घेतली. त्यानंतर सर्व सोपस्कर पूर्ण करुन अवघ्या २४ तासांत सत्यप्रत मिळाली.
राज्यघटनेचा प्रवास
राज्यघटना निर्मितीसाठी २ वर्षे ११ महिने १७ दिवसांचा कालावधी लागला होता. त्यासाठी एकूण ११ अधिवेशने झाली. त्यात ७ हजार ७३५ सूचना आल्या. २ हजार ४७३ सूचनांवर प्रत्यक्ष सभागृहामध्ये चर्चा करण्यात आली. ११ अधिवेशनांपैकी ६ अधिवेशनात उद्दिष्टांचा ठराव, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, अनुसुचित जाती या समित्यांच्या अहवालावर चर्चा झाली. पाच अधिवेशन घटना मसुदेच्या विचारासाठी खर्च झाले.