पारंपरिक चेहरा बदलण्याचा प्रयत्न
By admin | Published: December 26, 2016 03:51 AM2016-12-26T03:51:05+5:302016-12-26T03:51:05+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साचेबद्ध चौकटीतून बाहेर काढीत गर्दीकडून दर्दीकडे प्रवास घडविण्याच्या
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साचेबद्ध चौकटीतून बाहेर काढीत गर्दीकडून दर्दीकडे प्रवास घडविण्याच्या दृष्टीने साहित्य महामंडळाने सकारात्मक पावले उचलली असून, यंदाच्या डोंबिवली येथे होणाऱ्या ९0व्या साहित्य संमेलनात टॉक शो, बालकुमार मेळावा, बोलींवरील परिसंवाद, युद्धस्थ कथा, प्रतिभायन, आंतरभारती’ अशा नावीन्यपूर्ण कार्यक्रमांच्या नांदीतून संमेलनाचा पारंपरिक चेहरा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
डोंबिवली येथे दि. ३ ते ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी रविवारी जाहीर केली. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.
दि. ३ फेब्रुवारीला साहित्य संमेलनाला दरवर्षीप्रमाणे सकाळी ग्रंथदिंडीने प्रारंभ होणार आहे. मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर संमेलनाचा उद्घाटन सोहळा दुपारी ४ वाजता रंगेल. रात्री सुखदेव ढाणके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलन होणार असून, अशोक बागवे, अनुपमा उजागरे, इंद्रजित घुले, संजीवनी बोकील आदी मान्यवर सहभागी होतील. शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी अध्यक्षीय भाषणावर चर्चा हा कार्यक्रम होणार असून, विजय चोरमारे, डॉ. रामचंद्र काळुंखे, भानू काळे, प्रदीप दाते सहभागी होतील. यादिवशी चार परिसंवाद रंगणार आहेत. अनिल बोकील यांच्या अध्यक्षतेखाली ‘बदलती अर्थव्यवस्था, समाजाचे विघटन व मराठी लेखन’ या परिसंवादात डॉ. जगदीश कदम, डॉ. श्रीकांत बाराहाते, यमाजी मालकर, चंद्रशेखर टिळक भाग घेतील. ‘ग्रामीण स्त्री : वास्तवातील आणि साहित्यातील’ हा परिसंवाद डॉ. मधुकर वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तर माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता’ हा परिसंवाद होईल. बालकुमारांसाठी स्वतंत्र बालकुमार मेळावा रंगणार असून, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल.
रंगणार बोलीतील कथाकथन : परिसंवादासह मुलाखतींचा नजराणा
यंदा ’टॉक शो’ हा कार्यक्रम संमेलनात प्रथमच होणार असून, ‘साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व’ या विषयांतर्गत प्रा. रा. रं. बोराडे, संजय आवटे, प्रकाश एदलाबादकर, मल्हार अरणकल्ले, अरुण म्हात्रे, डॉ. उदय निरगुडकर सहभागी होतील. तसेच ‘कवी, कविता आणि काव्यानुभव’ हा वेगळा कार्यक्रम प्रभा गणोरकर, अशोक नायगावकर, संदीप खरे, श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत रंगेल.
नवोदित लेखक मेळावा, पाच नव्या कवींचे काव्यवाचन, युवा प्रतिभेला स्वतंत्र व्यासपीठ देणारा ‘शोध : युवा प्रतिभेचा’, विचार जागर आणि स्थानिक बहुभाषिकांचे आयोजन असलेला ‘आंतर-भारती’ आदी कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी ‘आम्हीच मराठीचे मारेकरी’ हा परिसंवाद डॉ. सुधीर रसाळांच्या अध्यक्षतेखाली रंगणार आहे. यात ज्ञानेश महाराव, दीपक पवार, बाळ फोंडके, अॅड. शांताराम दातार, प्रा. आनंद मेणसे, डॉ. रमेश जाधव, डॉ.कमलाकर कांबळे, कृष्णाजी कुळकर्णी विचार व्यक्त करतील.
कविसंंमेलन, ‘मराठी समीक्षेची समीक्षा’ या परिसंवादाबरोबरच मेधा पाटकर, सई परांजपे आणि सुधा मूर्ती या तीन प्रतिभावंतांच्या चर्चा आणि गप्पांवर आधारित ‘प्रतिभायन’ हा कार्यक्रम रंगणार आहे.
बोलींवरील भर हे या संमेलनाचे वैशिष्ट्य असून, बोलीतील कथाकथनात सुनील गायकवाड ( अहिराणी), सुमिता कोंडबत्तुनवार (झाडीबोली), राम निकम (मराठवाडी), बाबा परीट (कोल्हापुरी), भास्कर बडे (मिश्र), प्रसाद कांबळी (मालवणी) यांचा समावेश आहे. कांचन व कमलाकर सोनटक्के यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमदेखील होणार आहे.