‘गुजराती साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:48 AM2017-10-12T02:48:56+5:302017-10-12T02:49:13+5:30
उत्कृष्ट साहित्याचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी गुजराती साहित्यातील पाच पुस्तकांचा मराठीत तर पाच उत्कृष्ट मराठी पुस्तकांचा गुजरातीमध्ये अनुवाद करू
मुंबई : उत्कृष्ट साहित्याचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी गुजराती साहित्यातील पाच पुस्तकांचा मराठीत तर पाच उत्कृष्ट मराठी पुस्तकांचा गुजरातीमध्ये अनुवाद करू, असे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच केले.
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने २०१७च्या कवी नर्मद पारितोषिक, जीवन गौरव पारितोषिक आणि वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, कोणत्याही महान व्यक्तीचा गौरव हा त्याच क्षेत्रातील महान व्यक्तीच्या हस्ते व्हायला पाहिजे. गुजराती साहित्य अकादमीतर्फे वर्षभर होणाºया कार्यक्रमांचे नियोजन करावे, त्यांना पूर्ण सहकार्य करू, साहित्य क्षेत्रात, पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºयांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी, २०१७चा कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रतिलाल बोरीसागर, साहित्य पुरस्कार साहित्यिक आबिद सुरती, कला पुरस्कार गौतम जोशी, पत्रकारिता पुरस्कार शिरीष मेहता व संस्था पुरस्कार भवन्स कल्चरल सेंटर, अंधेरी यांना देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणाºया वाङ्मय पुरस्कारामध्ये चुनीलाल मडिया पुरस्कार (नवलकथा) प्रथम पुरस्कार वर्षा अडालजा आणि सोनल परीख यांना संयुक्तरीत्या तर द्वितीय पुरस्कार मालती कापडिया यांना तसेच नाटक विभागात देण्यात येणारा प्रबोध जोशी पुरस्कार उत्तम गडा यांना तसेच निबंध विभागातील वाडिलाल डगली पुरस्कार दीपक मेहता आणि तारिणीबहेन देसाई यांना संयुक्तरीत्या देऊन गौरविण्यात आले. या वेळी सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, डॉ. जे. जे. रावल, कार्याध्यक्ष नाविनभाई दवे, दिनकर जोशी आदी उपस्थित होते.