पोलिसांच्या वेशात दरोड्याचा प्रयत्न
By Admin | Published: May 16, 2016 02:27 AM2016-05-16T02:27:36+5:302016-05-16T02:27:36+5:30
मुथुट फायनान्सच्या येथील कार्यालयावर भरदिवसा शस्त्रधारी सहा दरोडेखोरांनी दरोडा घालण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद : सोन्यावर कर्ज देणाऱ्या मुथुट फायनान्सच्या येथील कार्यालयावर भरदिवसा शस्त्रधारी सहा दरोडेखोरांनी दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. यातील एक जण पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात होता. कार्यालयातील महिलांनी वेळीच दाखविलेल्या हुशारीमुळे दरोडेखोरांनी कारमधून पलायन केले.
या प्रकरणी व्यवस्थापक रिना रेजी तोमस यांच्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हॉटेल अमरप्रीत चौकात मुथुट फिनकॉर्पचे कार्यालय आहे. सकाळी ९ वाजता व्यवस्थापक रिना रेजी, हिमा बाबू आणि व्ही.जी. गिव्हरगीस यांनी कार्यालय उघडले. ९.४० वाजता सोनेरी रंगाच्या मोटारीतून दोघे कार्यालयाकडे आले. प्रथम पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशात असलेला दरोडेखोर खाली उतरला. त्याच्यासोबत इतर चौघे घुसले. दरोडेखोर हा व्यवस्थापक रिना रेजी यांच्या केबिनमध्ये घुसला. त्याने सोन्यावर कर्ज घेण्याची प्रक्रिया विचारली. तुमच्याकडे चोरीचे सोने ठेवले आहे, असे सांगून सहा महिन्यांचा डीव्हीआर मागितला. त्यावर व्यवस्थापकाने ओळखपत्र विचारले. तेव्हा इतर दरोडेखोर स्ट्राँग रूमकडे जात होते. हे पोलीस नाहीत, असे लक्षात येताच व्यवस्थापक महिलेने हिमा बाबू हिला मल्याळम भाषेतून अलार्म वाजविण्यास सांगितले. हिमाने अलार्म वाजविला. तेव्हा एक ग्राहक मुख्य दरवाजावर आलेला होता. तेवढ्यात व्यवस्थापक महिलेने दोघांना ढकलून बाहेर येऊन आरडाओरड केली. त्यानंतर दरोडेखोरांनी रिव्हॉल्व्हर दाखवून महिलांना धमकावले आणि आत ओढून नेले. तोपर्यंत बाहेर लोकांची गर्दी जमा झाली होती. दरोडेखोरांनी कारमधून पोबारा केला.