तीन मुलींना देहविक्रयासाठी विकण्याचा प्रयत्न
By admin | Published: March 9, 2016 05:30 AM2016-03-09T05:30:19+5:302016-03-09T05:30:19+5:30
अंधेरीमध्ये तीन मुलींना देहविक्रयासाठी विकण्याचा डाव मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने हाणून पाडला. या प्रकरणी दोघांना सोमवारी रात्री समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत
मुंबई: अंधेरीमध्ये तीन मुलींना देहविक्रयासाठी विकण्याचा डाव मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने हाणून पाडला. या प्रकरणी दोघांना सोमवारी रात्री समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत, स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले. या सर्वांची अधिक चौकशी सुरू आहे.
गौरव शर्मा (३०) आणि अपूर्व राऊत (३४) अशी अटक करण्यात आलेल्या या दोघांची नावे आहेत. अंधेरी पश्चिमच्या गुलमोहर मार्गावर स्टारबक्स हॉटेलजवळ काही लोक मुलींची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सापळा रचला आणि एका बोगस गिऱ्हाईकाला या दोघांना भेटण्यासाठी पाठविले. एका कारमधून हे दोघे तीन मुलींसोबत आले. या मुली कारमध्येच असताना या गिऱ्हाईकाने या दोघांकडे मुलींबाबत विचारणा केली. त्यानुसार, त्यांनी मागितलेले एक लाख रुपये या गिऱ्हाईकाने पुढे केले आणि त्याच क्षणी समाजसेवा शाखेच्या अन्य सहकाऱ्यांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
या ठिकाणाहून मुक्तता करण्यात आलेल्या तीन मुलींपैकी दोघी मॉडेल आहेत, तर तिसरी मुलगी ही माजी हवाई सुंदरी असून, या तिघींनाही चित्रपटात काम मिळवून देतो, असे आश्वासन शर्मा आणि राऊत यांनी दिले होते. (प्रतिनिधी)