प्रांताधिका-यांना जिवे मारण्याचा वाळू तस्कराचा प्रयत्न
By admin | Published: September 23, 2014 04:47 AM2014-09-23T04:47:14+5:302014-09-23T04:47:14+5:30
अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारे पळून जाण्याचा प्रयत्न करीत थेट प्रांताधिका-यांनाच जिवे मारण्याचा प्रयत्न केला
अकलूज (सोलापूर) : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारे पळून जाण्याचा प्रयत्न करीत थेट प्रांताधिका-यांनाच जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ट्रकने प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीलाच धडक दिली. मात्र सुदैवाने त्यात ते बचावले.
निवडणूक कामासाठी अकलूजहून वेळापूरला निघालेल्या प्रांताधिकारी अमृत नाटेकर यांना प्रतापसिंह चौकात वाळूचा ट्रक दिसला. त्यांनी ट्रक चालक नारायण कल्याण भोळे (रा. लवंग, ता. माळशिरस) यास वाळू वाहतुकीच्या परवान्याची मागणी केली. चालकाकडे परवाना नसल्याने नाटेकर यांनी त्यास ट्रक पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितले. परंतु त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. नाटेकर यांनी त्याचा पाठलाग ट्रक सदुभाऊ चौकात पकडला. त्यानंतर पुन्हा एकदा चालकाने ट्रक पुण्याच्या दिशेने पळविण्याचा प्रयत्न केला.
नाटेकर यांनी निरा नदीच्या पुलावर सराटी येथे तो अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी चालकाने थेट प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला जोरदार धडक देत त्यांची गाडी पुलावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र नाटेकर यांनी गाडीतून
उडी मारल्याने ते बचावले. मात्र या गडबडीत चालकाचा ट्रकवरील
ताबा सुटल्याने ट्रक कठडा तोडून नदी पात्रात लोंबकळू लागला. ट्रक चालकाने पुन्हा पळून जात असताना कोतवाल सोमनाथ कस्तुरे यांनी त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)