क्षयरोग रजेला विलंब
By admin | Published: September 19, 2016 05:43 AM2016-09-19T05:43:23+5:302016-09-19T05:43:23+5:30
महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना क्षयरोग झाल्यास त्यांना अडीच महिन्यांची रजा द्यावी, असे परिपत्रक सरकारने काढले आहे.
मुंबई : महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना क्षयरोग झाल्यास त्यांना अडीच महिन्यांची रजा द्यावी, असे परिपत्रक सरकारने काढले आहे. पण, अध्यादेश अजूनही लालफितीत अडकला आहे.
परळच्या केईएम रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला क्षयरोगाच्या उपचारासाठी रजा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा रजेचा विषय चर्चेत आला. रुग्णालयातील प्रशासकीय विभाग निवासी डॉक्टरांच्या रजा मंजूर करते. या विभागाला परिपत्रक देण्यात आले असूनही रजा देण्यास नकार दिला जातो. मंत्र्यांच्या उपस्थितीत क्षयरोगाच्या उपचारांसाठी निवासी डॉक्टरांना आणि गर्भवती निवासी डॉक्टरांना अडीच महिन्यांची रजा मंजूर करण्यात आली आहे. तरीदेखील महापालिकेच्या रुग्णालयांत ही रजा दिली जात नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांना त्रास सहन करावा लागत असल्याचे मत मार्डचे अध्यक्ष
डॉ. सागर मुंदडा यांनी मांडले.
प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, निवासी डॉक्टरांना शिक्षणाच्या तीन वर्षांच्या कालावधीत तीन महिने रजा मंजूर असते. ही रजा डॉक्टरांना मिळते. पण, क्षयरोगाच्या उपचारासाठी अडीच महिने रजा देण्याचा अध्यादेश अजूनही आलेला नाही. परिपत्रक प्रशासकीय विभागाला देण्यात आले आहे. नियमानुसार, प्रशासकीय विभाग रजा मंजूर करीत नाही. पण, निवासी डॉक्टरांना क्षयरोगाच्या उपचारासाठी रजा दिली जाते. मार्डशी चर्चा करून त्यांना एक पत्र पाठविण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)