नळांना मीटर; अवैध नळांचे काय?
By Admin | Published: January 26, 2017 10:12 AM2017-01-26T10:12:34+5:302017-01-26T10:38:20+5:30
अकोला महापालिकेचा ऑडिट रिपोर्ट; ३0 टक्के नळजोडणी अवैध असल्यांची खुद्द आयुक्तांनी दिली माहिती.
अकोला: महापालिकेतील नळांना मीटर लावण्याची मोहीम महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सुरू केली. त्याला काही प्रमाणात यशही मिळाले, मात्र काही ठिकाणी नगरसेवक आणि नागरिकांनी थेट विरोध दर्शविल्याने नळांना मीटर लावता आले नाही. अकोला महानगरात होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांना मीटर लावणे गरजेचे आहे, असा आयुक्तांनी आग्रह धरला . यासाठी काही विशेष पथकांची नेमणूकही करण्यात आली होती. मात्र, ही मोहीम मध्येच थांबली. अकोला महापालिकेतील ३0 टक्के नळजोडणी ही अवैध असल्याची माहिती दस्तुरखुद्द आयुक्तांनी दिली. त्यामुळे नळांना मीटर लावण्याची मोहीम राबविण्यासोबतच अवैध नळजोडणी शोधुन काळत पाणी चोरा विरोधात धडक मोहीम हाती घेण्याची गरज आहे. महानगरातील झोपडपट्टी परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध नळजोडणी झालेली आहे. एकीकडे काही अकोलेकर नियमित कराचा भरणा करतात, तर दुसरीकडे फुकटचे पाणी काही अकोलेकर वापरतात. अवैध पाणी वापरणार्यांना कोणतेही नियम न लावता, कर भरणार्यांवर विविध कर लावण्याची मोहीम महापालिका प्रशासनाच्या वतीने राबविली जात आहे. या मोहिमेविरुद्ध अकोलेकरांमध्ये रोष आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने अवैध नळजोडणीचा प्रश्न उपस्थित होणे गरजेचे आहे. मात्र कोणता पक्ष या मुद्याकडे निवडणुकीत लक्ष देतो, याकडे अकोलेकरांचे विशेष लक्ष लागून आहे.