उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यातील धरणे तुडुंब!; तब्बल ७० टक्के साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 05:13 AM2020-02-15T05:13:01+5:302020-02-15T05:13:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे यंदा राज्यातील बहुतांश प्रमुख धरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे यंदा राज्यातील बहुतांश प्रमुख धरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. राज्यात फेब्रुवारीच्या पंधरवड्यातही तब्बल ९४० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणात अवघा ५२० ते ५२५ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
राज्यात २०१८ च्या मान्सूनमध्ये परतीच्या पावसाने ओढ दिली होती. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाने सरासरी देखील गाठली नव्हती. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर, इंदापूर आणि दौंड या भागात तीव्र पाणीटंचाई होती. अनेक ठिकाणी चारा छावण्या उभाराव्या लागल्या. मराठवाड्यात तीच स्थिती होती. यंदा मात्र, मान्सून लांबल्याने धरणे अजूनही भरली आहेत. मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा सुरु होतील. धरणातील पाणीसाठा पाहता यंदाचा उन्हाळा सुसह्य असणार आहे.
राज्याची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १ हजार ४४४ टीएमसी आहे.
मोठ्या धरणांत पाणी
मोठ्या धरणांची क्षमता १ हजार २७ टीएमसी आहे. त्यात ७४७.५९ टीएमसी (७२.७७ टक्के) पाणी आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये १९१.०७ पैकी १०७.८० टीएमसी (५६.४२ टक्के) आणि लघु प्रकल्पांमधे २२५.७६ पैकी ८४.५३ टीएमसी (३७.४४ टक्के) पाणी आहे.