सलमानच्या लायसन्सबाबत मंगळवारी निर्णय
By Admin | Published: February 28, 2015 05:15 AM2015-02-28T05:15:52+5:302015-02-28T05:15:52+5:30
हिट अॅण्ड रन खटल्यात अभिनेता सलमान खानचा वाहन परवाना सादर होणार की नाही, याचा निर्णय येत्या मंगळवारी सत्र न्यायालय देणार आहे़
मुंबई : हिट अॅण्ड रन खटल्यात अभिनेता सलमान खानचा वाहन परवाना सादर होणार की नाही, याचा निर्णय येत्या मंगळवारी सत्र न्यायालय देणार आहे़
२००२ साली हा अपघात झाला तेव्हा सलमानकडे वाहन परवाना नव्हता़ त्याला वाहन परवाना २००४ साली मिळाला, असा सरकारी पक्षाचा दावा आहे़ आरटीओ अधिकाऱ्यानेही सलमानला २००४ साली वाहन परवाना मिळाल्याची साक्ष दिली आहे़ त्यामुळे सलमानने त्याचा वाहन परवाना न्यायालयात सादर करावा, अशी मागणी करणारा अर्ज विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला़
याला बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे यांनी विरोध केला़ ही घटना घडली त्या वेळी सलमानकडे वाहन परवाना नव्हता, हे सरकारी पक्षाने त्यांच्याजवळ असलेल्या पुराव्यांच्या आधारे सिद्ध करावे़ यासाठी सलमानचा वाहन परवाना न्यायालयात सादर करण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद अॅड़ शिवदे यांनी केला़ उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाच्या अर्जावरील निर्णय येत्या मंगळवारपर्यंत राखून ठेवला़