इंद्रायणीच्या तीरावर लोटला जनसागर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 02:40 PM2018-03-03T14:40:24+5:302018-03-03T14:46:06+5:30
देऊळवाड्यातून पालखीचे वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान झाले.
श्री क्षेत्र देहूगाव : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या बीज सोहळयासाठी इंद्रायणी तीरावरील देहूगाव येथे जनसागर लोटला होता. ‘याचि देही याची डोळा’ लक्ष-लक्ष डोळ्यांनी, तुकाराम भक्तांनी अभूतपूर्व सोहळा अनुभवला. भक्तीमय वातावरणाने आणि हरिनाम संकीर्तनात देहूनगरी न्हाऊन निघाली आहे.
संत तुकाराममहाराजांच्या ३७० व्या बीजसोहळ्यासाठी राज्यातील विविध भागांतून शुक्रवारी संध्याकाळीच दिंड्या आणि वारकरी दाखल झाले होते. विविध गावच्या दिंड्या व फडांवर गाथा पारायण सोहळे व भजन, कीर्तन आणि हरिपाठाचे कार्यक्रम सुरू होते. यात्रेनिमित्त गावात आलेले भाविक वैष्णव व यात्रेकरू आणि स्थानिक ग्रामस्थांना या मंदिरांवरील विद्युत रोषणाई काही काळ थांबून ही मुक्त रंगांची उधळण पाहण्याचा मोह आवरता आला नाही, असे चित्र इंद्रायणी नदीच्या पुलावर व देहू-आळंदी रस्ता व देहू- देहूरोड रस्त्यावर महाद्वार कमान, वैकुंठमंदिर परिसर, चौदा टाळकरी प्रवेशद्वार कमान, महाद्वार आणि ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पहायला मिळत होते.
श्री संत तुकाराममहाराज वैकुंठगमन सोहळयाच्या निमित्ताने संस्थानच्या वतीने शनिवारी पहाटे पहाटे ३ वाजता श्रींच्या मंदिरात काकड आरती, ४ वाजता श्रींची महापूजा संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्थ व वारकºयांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी ६ वाजता वैकुंठगमन मंदिरात श्री संत तुकाराममहाराज मंदिरातील महापूजा झाली. सकाळी १०.३० वाजता. देऊळवाड्यातून पालखीचे वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान झाले. त्याचवेळी देहूकर मंहाराजांचे वैंकुठ सोहळा प्रसंगावर कीर्तन झाले.
सकाळी अकरापासूनच वैकुठ स्थान परिसरात सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी लोटली होती. दुपारी बाराला ‘तुकाराम तुकाराम’ असा जयघोष झाला आणि वैकुंठ स्थावरील नादुंरकीच्या वृक्षाच्या दिशेने बेल फुले, लाह्यांची उधळण केली. सोहळा अनुभवला. त्यानंतर दुपारी १२़३० वाजता पालखी परत मुख्य मंदिरात असे संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे यांनी सांगितले.