वैष्णवांना आस तुकोबांच्या पालखी सोहळ्याची
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 01:53 PM2019-06-24T13:53:47+5:302019-06-24T14:03:14+5:30
हरिनाम गजराने देहूनगरी भक्तिमय झाली आहे
विश्वास मोरे
देहूगाव : विठ्ठल भेटीची आस मनी ठेऊन आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार आहे. प्रस्थान सोहळ्याची वेळ समीप आल्याने वैष्णवांचा टाळ मृदंग गजर सुरू झाला आहे. हरिनाम गजराने देहूनगरी भक्तिमय झाली आहे. सर्वांना ओढ लागली आहे ती पालखी सोहळा प्रस्थानाची.
श्रीसंत तुकाराममहाराज संस्थान व प्रशासनदेखील भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून आषाढी वारीच्या निमित्ताने देहूनगरीत आलेल्या वारकरी व भाविकांमुळे सारा परिसर भक्तिमय झाला आहे.
आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी कालपासून देहूनगरीत दाखल झाले आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वैकुंठगमण मंदिर, येलवाडी येथील भागीरथी माता मंदिर, विठ्ठलनगर येथील पादुका मंदिर व चिंचोली पादुका मंदिर व अनगडशहावली दर्गा परिसरात वारकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.
पालखी प्रस्थानाचा दिवस असल्याने सकाळपासूनच वारकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.
भागवत धर्माची भगवी पताका आसमंती फडकवत वारकरी
विट्टल रुक्मिणी मंदिरात येताना दिसत आहेत. या भाविकांच्या सेवेसाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून आले. पोलीस बंदोबस्तालाही कालपासूनच सुरुवात झाली आहे.
श्रीसंत तुकाराममहाराजांच्या पालखीचे प्रस्थान कार्यक्रमाला सोमवारी पहाटे नैमित्तिक महापूजेने सुरुवात झाली.
श्रीसंत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने सोहळा प्रमुख संजय मोरे, काशिनाथ मोरे, अजित मोरे यांनी शिळा मंदिरात महापूजा केली.
त्यानंतर तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरात विश्वस्त माणिक मोरे, विशाल मोरे, संतोष मोरे यांनी महापूजा केली. सकाळी दहा वाजता रामदास नाना मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर श्रीसंत तुकाराममहाराजांच्या पादुका सेवेकरी सुनील घोडेकर सराफ यांच्याकडे चकाकी देऊन मानकरी म्हसलेकर यांनी इनामदार वाड्यात आणल्या . तेथे त्यांची दिलीपमहाराज गोसावी (मोरे) इनामदार यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.
सोहळ्यास उरला काही तासाचा अवधी
इनामदार वाड्यातून पादुका मुख्य मंदिरात प्रस्थानपूर्वी पूजेसाठी भजनी मंडपात आणल्या जाणार असून मुख्यमंदिराच्या भजनी मंडपात या पादुकांची विविध मान्यवरांच्या व शासकीय अधिकाºयांच्या उपस्थितीत पूजा होणार आहे. दुपारी अडीचला मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होईल. सोहळ्यास आता काही तासाचा अवधी शिल्लक राहिला आहे.
...................
यंदा पाऊस लांबला आहे. शेतीची कामे अपूर्ण राहिल्याने सोहळ्याच्या गर्दीवर परिणाम झाला आहे. सोहळा पुण्याबाहेर पडल्यावर गर्दी वाढेल असा अंदाज देवस्थान ने व्यक्त केला आहे.
....................
सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. उकाडा ही जाणवत आहे. अधूनमधून हलक्या पावसाच्या सरीही येत आहेत. त्यामुळे भक्तीरंग गहिरा होत आहे.
....................
क्षणचित्रे
1) यंदाचा सोहळा ३३४ वा
2) सोहळ्यात 314 दिंड्याचा सहभाग
3) विठ्ठल मंदिर परिसरात आरोग्य विभागातर्फे स्वच्छता.
४) सुरक्षिततेसाठी छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही ची नजर.
5) पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
6) महिला आयोगाच्या वतीने यंदा वारीत सहभागी महिलांना सॅनिटरी नॅपकीन.
7) निर्मल आणि हरित वारी. वारीमार्गावर वृक्षारोपण.
8) विविध वृत्तवाहिन्या, माध्यमातर्फे सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण.
9) वाहतुकीचे नियोजन.