तुकाराम मुंडे नाशिक महापालिकेचे आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 05:47 AM2018-02-08T05:47:40+5:302018-02-08T05:47:54+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची पुण्याहून अवघ्या १० महिन्यात बदली करण्यात आली आहे.
मुंबई : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची पुण्याहून अवघ्या १० महिन्यात बदली करण्यात आली आहे. पीएमपी नावाने परिचित असणा-या या नागरी प्रवासी वाहतुकीत शिस्त आणण्याचे प्रयत्न करणा-या मुंडे यांना आता नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे.
तर नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची बदली महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे सह कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. आयएएस अधिकाºयांना सध्या दोन महिन्यातच बदलले जात आहे तेथे तुकाराम मुंडे यांना १० महिने पुण्यात मिळाले. पीएमपीमध्ये नगरसेवकांनीच त्यांच्या वशिल्याने कंत्राटी कामगारांची भरती केली होती. त्यातील काम न करणाºया २५० कंत्राटी कामगारांना मुंडे यांनी कामावरुन कमी केले होते. पीएमपीच्या इमारतीतील राष्टÑवादी काँग्रेसच्या कामगार संघटनेचे कार्यालय होते. ते हटविण्याची नोटीस मुंडे यांनी मंगळवारी दिली होती. मात्र, कारवाई करण्यापूर्वीच त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी निघाले. मुंडे यांच्या जागी नैना गुंडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची बदली करण्यात आली होती ; पण ती भाजपा नेत्यांनीच रद्द करायला लावली. त्यामुळे त्या जागी आता एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. कुरुंदकर ३१ आॅगस्ट २०१८ ला निवृत्त होत आहेत. पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेमा देशभ्रतार यांची बदली सामाजिक न्याय विभागात उपसचिव म्हणून करण्यात आली आहे. दूध फेडरेशन (महानंद)च्या व्यवस्थापकीय संचालकपदी दिपककुमार मिना यांची नेमणूक करण्यात आली आहे.
>नैना गुंडे यांची नियुक्ती
आयएएस अधिकाºयांची सध्या दोन महिन्यांतच बदली केली जात आहे़ मुंडे यांना मात्र पुण्यात १० महिने कार्यकाळ मिळाला़
पीएमपीच्या इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय होते़
ते हटवण्याची नोटीस मुंडे यांनी मंगळवारी दिली आणि त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी निघाले़ त्यांच्या जागी नैना गुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यामुळे चर्चा रंगली आहे़