तुकाराम मुंढे संयमाने वागा नाहीतर सर्व कठीण, उद्धव ठाकरेंचा सल्ला

By admin | Published: October 27, 2016 07:35 AM2016-10-27T07:35:52+5:302016-10-27T08:12:49+5:30

संयमाचा बांध तोडून डोक्यात राग घालून काम केले तर त्यांचे कठीण आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढेंना जरा जपून वागण्याचा सल्ला दिला आहे

Tukaram Mundhe should be restrained, otherwise all the difficult, advice of Uddhav Thackeray | तुकाराम मुंढे संयमाने वागा नाहीतर सर्व कठीण, उद्धव ठाकरेंचा सल्ला

तुकाराम मुंढे संयमाने वागा नाहीतर सर्व कठीण, उद्धव ठाकरेंचा सल्ला

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - आयुक्त हा सरकारचा प्रतिनिधी असतो व त्याने घटना व कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचे असते. लोकप्रतिनिधींच्या कुंडल्या काढून त्यांना अडचणीत आणायचे व स्वत:चा धडाकेबाजपणा सिद्ध करायचा हे योग्य नाही. स्वत: मुख्यमंत्री विरोधकांशी विनम्रतेने वागतात व तेवढा संयम हा ठेवायलाच हवा. राज्य संयमाने व एकीने चालवायचे असते. तुकाराम मुंढे यांच्यासमोर मोठी कारकीर्द आहे. त्यांना मोठे काम करायचे आहे, पण संयमाचा बांध तोडून डोक्यात राग घालून काम केले तर त्यांचे कठीण आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून तुकाराम मुंढेंना जरा जपून वागण्याचा सल्ला दिला आहे. 
 
नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. मुंढे यांच्या विरोधात १०४ तर बाजूने फक्त ६ मते पडली. लोकशाहीत बहुमताला किंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला पेटू नये. निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी एकमुखाने मुंढे यांच्या विरोधात उभे ठाकले असतील तर सरकारला बहुमताचा आदर करावाच लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना कस्पटासमान लेखणे व त्यांना अडचणीत आणण्यासाठीच अधिकाराचा वापर करणे ही मनमानी आहे. मुंढे यांनी गेल्या पाच महिन्यांत शुभारंभाचे नारळ फोडून १५ रुपयांच्याही कामांचा शुभारंभ झाला नाही, फेरीवाले, प्रकल्पग्रस्तांवर अन्यायकारक कारवाई केली, मनमानी कारभार करून लोकप्रतिनिधींना डावलले असे अनेक आक्षेप मुंढेविरोधात स्थानिक नगरसेवकांनी घेतले आहेत. त्यांचेही उत्तर मुंढे यांनी द्यायला हवे. खरे तर मुंढे जेथे गेले तेथे त्यांच्यावर अशी वेळ आली. त्यामुळे त्यांनीच या गोष्टीचे आत्मपरीक्षण करायला हवे असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
 
एखाद्या ‘डॉन’ किंवा ‘रॉबिनहुड’प्रमाणे वागून लोकप्रियता मिळविल्यानेच अधिकारी चांगला ठरतो असे नाही. ठाणे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त जयस्वाल हे कोणताही गाजावाजा न करता काम उत्तम व धडाकेबाज पद्धतीने करीत आहेत. तेसुद्धा मुख्यमंत्र्यांच्याच खास मर्जीतले असल्याची बातमी आहे. मुंढेही मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतलेच असल्याचे बोलले जाते, पण मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले आहोत म्हणून कसेही वागण्याचा व मनमानी करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
जी. आर. खैरनार, तुकाराम मुंढे, चंद्रकांत गुडेवार, सुनील केंद्रेकर वगैरे लोकांनी प्रशासकीय सेवेच्या परीक्षा दिल्या व सरकारी सेवेत आले, पण जे निवडून येतात त्यांना रोजच नव्या परीक्षेला तोंड द्यावे लागते. त्यांच्यावरच्या जबाबदार्‍या मोठ्या व अवघड असतात. प्रशासनातील अधिकार्‍यांना अशा कोणत्याही अवघड परीक्षांना सामोरे जावे लागत नाही. दर पाच वर्षांनी जनतेला कामाचा हिशेबही द्यावा लागत नाही. म्हणूनच काही अधिकार्‍यांना प्रामाणिकपणा व हिमतीचा अहंकार चढतो व त्यांच्या कर्तबगारीचे मातेरे होते अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
राज्य संयमाने व एकीने चालवायचे असते. तुकाराम मुंढे यांच्यासमोर मोठी कारकीर्द आहे. त्यांना मोठे काम करायचे आहे, पण संयमाचा बांध तोडून डोक्यात राग घालून काम केले तर त्यांचे कठीण आहे. फडणवीस आज त्यांचा अहंकार राजकीय स्वार्थासाठी कुरवाळतील, उद्याचे काय? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
 

Web Title: Tukaram Mundhe should be restrained, otherwise all the difficult, advice of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.