तुकाराम मुंढेंची ‘दम’दार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 02:35 AM2017-03-30T02:35:40+5:302017-03-30T02:35:40+5:30

कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या

Tukaram Mundhechi's 'Vigorous Beginning' | तुकाराम मुंढेंची ‘दम’दार सुरुवात

तुकाराम मुंढेंची ‘दम’दार सुरुवात

Next

पुणे : कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत बेशिस्तीला लगाम घालण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी कामाच्या वेळेत बदल करण्याबरोबरच कामकाजात शिस्त आणण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांना मुंढे यांच्या कामाचा ‘दम’दार अनुभव आल्याची चर्चा ‘पीएमपी’त रंगली आहे.
मुंढे यांनी ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तासाभरात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, महाव्यवस्थापक (वाहतूक) अनंत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, प्रशासन अधिकारी विजयसिंह परदेशी यांच्यासह अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मुंढे यांनी बैठकीत पीएमपीच्या कामकाजाचा आढावा घेत सद्य:स्थिती जाणून घेतली. कामातील शिस्तीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे आग्रही भूमिका मांडली. पीएमपीची सध्याची कामाची वेळ सकाळी साडेदहा ते सायंंकाळी साडेपाच ही आहे. या वेळेत बदल करण्याचे आदेश मुंढे यांनी दिली. त्यानुसार आता ही वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ अशी आठ तासांची असेल.
तसेच ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण, मार्गावरील बसची संख्या यावरून नाराजी व्यक्त करीत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. (प्रतिनिधी)

हेल्पलाइन सक्षम करा

मुंढे यांनी बैठकीतच आपल्या मोबाइलवरून पीएमपीच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला. मोबाइल स्पीकर मोडवर ठेवला होता. पाच-सहा रिंग वाजल्यानंतरही हेल्पलाइनवरून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून अधिकारीही स्तब्ध झाले. अखेर प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंढे यांनी संबंधित कर्मचाऱ्याची हेल्पलाइनवर झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांनाही हेल्पलाइन सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. तक्रार आल्यानंतर त्याचे २४ तासांत निराकरण करून संबंधितांना कळवावे, असा आदेश दिला.

आयटीचा वापर वाढविणार
डॉ. श्रीकर परदेशी तसेच इतर अधिकाऱ्यांनी घेतलेले चांगले निर्णय पुढेही कायम ठेवले जातील. परदेशी यांनी माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) वापर वाढवला होता. ‘आयटी’च्या उपयोगामुळे कार्यक्षमता वाढते. पारदर्शकताही येते. पर्यायाने संंस्थेच्या कामकाजातही सुधारणा होतात. त्यादृष्टीने अडचणींचा अभ्यास करून त्याचा विचार केला जाईल, असे सांगून मुंढे यांनी ‘आयटी’चा वापर वाढविण्याचे संकेत दिले.

पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी मुंढेसूत्री

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वेळा पाळायला हव्यात.
वाहक, चालकांनी आगारातून बस बाहेर काढताना एक मिनिटही उशीर करू नये.
कर्मचाऱ्यांनी गणवेश घातलाच पाहिजे.
चहा पिण्यासाठी बाहेर जाऊन वेळ घालवत कोठेही भटकू नये. बाहेर पडताना तशी नोंद करणे अपेक्षित आहे.
धूम्रपान केलेले चालणार नाही.

Web Title: Tukaram Mundhechi's 'Vigorous Beginning'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.