तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला
By admin | Published: November 2, 2016 06:24 PM2016-11-02T18:24:01+5:302016-11-02T18:24:01+5:30
लोकाभिमुख कामांमुळे राजकीय रोषाला कारणीभूत ठरलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव राज्य सरकारने बुधवारी फेटाळला.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई , दि. 02 - लोकाभिमुख कामांमुळे राजकीय रोषाला कारणीभूत ठरलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव राज्य सरकारने बुधवारी फेटाळला.
नवी मुबंई महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. यावेळी अपक्षांसह शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या १०४ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले होते, तर भाजपाच्या सहा नगरसेवकांनी मुंढेंचे समर्थन केले. १०४ विरुद्ध ६ मतांनी मंजूर झालेला अविश्वास ठराव राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला होता, हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव फेटाळल्याने आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना चांगलीच चपराक बसल्याचे म्हणावे लागेल.
पाच महिन्यांपूर्वी आयुक्तपदी आल्यापासून मुंढे यांनी अतिक्रमण, अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली होती. त्यांना जनतेतून पाठिंबा होता, मात्र या कारवाईमुळे दुखावलेल्या नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला होता.