तुकाराम मुंढेंवर आज अविश्वास ठराव
By admin | Published: October 25, 2016 02:32 AM2016-10-25T02:32:40+5:302016-10-25T02:32:40+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मंगळवारी अविश्वास ठराव दाखल होणार आहे. मंगळवार, २५ आॅक्टोबरला अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विशेष
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मंगळवारी अविश्वास ठराव दाखल होणार आहे. मंगळवार, २५ आॅक्टोबरला अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. १११ नगरसेवकांच्या सभागृहात भाजपाचे ६ सदस्य तटस्थ राहणार आहेत. शिवसेना, काँगे्रस, राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवकांनी ठरावास पाठिंबा दिला असून, ‘मुंडे हटाव’चा नारा देत नागरिकही मोठ्या प्रमाणात मुख्यालयाबाहेर एकत्र होणार आहेत.
सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतल्याने राज्यभर प्रसिद्धी मिळविलेले सनदी अधिकारी तुकाराम मुुंढे यांची मे २०१६मध्ये नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. पहिल्याच दिवसापासून त्यांनी धाडसी निर्णय घेण्यास सुरुवात केली. निष्काळजीपणाचा ठपका ठेवून अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले. अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. पण, लोकप्रतिनिधींबरोबर संवाद ठेवला नसल्याने नाराजी वाढत गेली. पालिकेत आल्यापासून पाच महिन्यांत महापौर सुधाकर सोनावणे यांची एकदाही भेट घेतली नसल्याने त्यांनी मनपा मुख्यालयावर बहिष्कार टाकला. सर्वपक्षीय नगरसेवकांना आयुक्त भेटण्यासाठी वेळ देत नव्हते व त्यांनी सुचविलेली कामे करत नसल्याने नाराजी वाढली होती. तरी त्यांच्या चांगल्या कामामुळे सोशल मीडियामधून मात्र अनेकांनी पाठिंबा दिला आहे. मंगळवारच्या सर्वसाधारण सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
आयुक्तांवर पहिल्यांदाच अशी वेळ
- पालिकेमध्ये १११ नगरसेवक आहेत. भाजपाच्या
६ नगरसेवकांनी तटस्थ राहण्याचे निश्चित केले असून, उर्वरित शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीच्या १०५ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच आयुक्तांवर अविश्वास ठराव मांडण्यात येत आहे.
मुंढे सुटीवर
अविश्वास ठरावाच्या पूर्वसंध्येला आयुक्त तुकाराम मुंढे हे एक महिन्याच्या रजेवर गेल्याचे वृत्त शहरात पसरले आहे. याविषयी अधिकृत माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिलेली नाही.