डुलकीबहाद्दर कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढे यांचा दणका
By admin | Published: April 6, 2017 12:36 AM2017-04-06T00:36:50+5:302017-04-06T00:36:50+5:30
तुकाराम मुंढे यांनी कार्यालयीन वेळेत झोपा काढणाऱ्या दहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाला शिस्त लावण्यासाठी पहिल्या दिवसापासून धडाका लावलेले अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कार्यालयीन वेळेत झोपा काढणाऱ्या दहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
तीन दिवसांपूर्वी नऊ डुलकीबहाद्दरांना निलंबित करण्यात आले होते. बुधवारी आणखी १० कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले. हे सर्व कर्मचारी पीएमपीएमएलच्या पिंपरी, भोसरी आणि निगडी डेपोमध्ये सोमवारी रात्री आॅनड्युटी झोपा काढत असल्याचे निदर्शनात आले होते.
मुंढे यांनी सर्व डेपोची रात्री तपासणी करण्यासाठी चार जणांचे पथक नेमले आहे. या पथकाने पाहणीनंतर ही कारवाई केली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईत गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कोथरूड आणि पुणे स्टेशन डेपोमधील नऊ कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी आॅनड्युटी असताना झोप काढणे चांगलेच महागात पडले होते.
निलंबन केलेल्या नऊ जणांपैकी दोन चालक असून, सात कर्मचारी हे गाड्यांची दुरुस्ती करणाऱ्या वर्कशॉपमधील होते. अशी कारवाई करत मुंढे हे पीएमपीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. मंगळवारी रामनवमीची सुटी असल्याने त्यांच्यावर कारवाई करता आली नाही. आज त्यांना निलंबित करण्यात येईल, असे पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)