‘तूरकोंडी’त टोकणचा गोंधळ!

By admin | Published: May 1, 2017 04:58 AM2017-05-01T04:58:52+5:302017-05-01T04:58:52+5:30

राज्यात २२ एप्रिलपर्यंत टोकण पद्धतीने नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी सरकारने नव्याने

Tukkondi is a mess of token! | ‘तूरकोंडी’त टोकणचा गोंधळ!

‘तूरकोंडी’त टोकणचा गोंधळ!

Next

रूपेश उत्तरवार / मुंबई/यवतमाळ
राज्यात २२ एप्रिलपर्यंत टोकण पद्धतीने नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी सरकारने नव्याने काढलेल्या खरेदी आदेशात ‘टोकण’चा उल्लेखच नसल्याने पणन विभागाचे अधिकारी गोंधळात आहेत.
राज्यात २२ एप्रिलपर्यंत हमीभावाने ४० लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. परंतु खरेदी केंद्रांवरील ८ लाख क्विंटल आणि शेतकऱ्यांकडील टोकण पद्धतीने नोंदणी झालेली ७ लाख क्विंटल, अशी एकूण १५ लाख क्विंटल तूर खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. सरकार फक्त दहा लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे.
तूरकोंडीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी टोकणवरील सर्व तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, हस्तक्षेप योजनेतंर्गत काढण्यात आलेल्या खरेदी आदेशात ‘टोकण’चा उल्लेखच नाही. त्यामुळे पणनचे अधिकारी फक्त खरेदी केंद्रावरील तूरीचे माप करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडील तुरीचे काय होणार, हा प्रश्नच आहे. यासंदर्भात सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नोंदणी केलेल्या पण शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या तुरीबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सद्यस्थितीत केंद्रावर असलेली तूर प्राधान्याने खरेदी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रात असलेली शेतकऱ्यांची तूर खरेदी करताना तालुक्याबाहेरचे शेतकरी किंवा इतर ठिकाणचे शेतकरी असा भेद होणार नाही. मात्र ही तूर शेतकऱ्यांची आहे किंवा नाही हे तपासले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या स्थितीत जागेचा प्रश्न भेडसावत आहे. केंद्रीय वखार महामंडळ आणि राज्य वखार महामंडळात तूर ठेवायला जागा नाही. यामुळे खरेदी झालेली तूर दोनशे किलोमीटर अंतरापर्यंत इतरत्र हलविण्याच्या सूचना आता सहकार मंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे तूर ठेवण्याची पावती मिळताच शेतकऱ्यांना आरटीजीएसच्या मदतीने चुकारे मिळणार आहेत.
बारदान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला बारदाना खरेदीचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे बारदान्याच्या तुटवड्याने यापुढील काळात तूर खरेदी थांबणार नाही, याची खबरदारी सहकार विभागाने घेतली आहे.


मोजमाप...
नाफेडद्वारे तूर खरेदी पुन्हा सुरु करण्यात आल्याने तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप सुरु झाले आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तुरीच्या पोत्यांचा असा खच पडलेला आहे.

राज्यातील तूर इतरत्र हलविणार
राज्य शासन १० लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. ही तूर मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इतर राज्याकडे ती वळती करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने इतर राज्यांचा शोध घेण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिले आहेत. लवकरच खरेदी होणारी तूर इतरत्र हलविली जाणार आहे.

नाफेडचे दोनशे कोटींचे चुकारे अडकले
४० लाख टन तुरीची खरेदी नाफेडने कली. या तुरीचे चुकारे अदा करण्याचे काम नाफेडची यंत्रणा करीत आहे. नाफेड २२ एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे देणार आहे. या यंत्रणेकडे राज्यातील शेतकऱ्यांचे दोनशे कोटींचे चुकारे अडकले आहे. या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांना महिनाभराची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

राज्यातील  केंद्रांवर आलेली तूर प्राधान्याने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर टोकनवरील तूर शहानिशा करून खरेदी होणार आहे.
- सुभाष देशमुख,
सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री

Web Title: Tukkondi is a mess of token!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.