तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची सांगता शनिवारी होणार
By Admin | Published: July 29, 2016 08:55 PM2016-07-29T20:55:30+5:302016-07-29T20:55:30+5:30
ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दणाणला. पिंपरीगावातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याची मनोभावे सेवा केली.
पिंपरी : भूवैकुंठातील सावळ्या विठ्ठलाची भेट घेऊन परतीच्या मार्गावर निघालेला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत प्रवेशिला. ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दणाणला. पिंपरीगावातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याची मनोभावे सेवा केली. सोहळा पिंपरीत मुक्कामास राहणार असून, शनिवारी श्रीक्षेत्र देहूगावात पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.
आषाढी वारीसाठी तुकोबारायांच्या पालखीने श्रीक्षेत्र देहूगाव येथून २७ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले होते. आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेऊन सोहळा परतीच्या मार्गावर निघाला. काल पुण्यात पालखीचा मुक्काम होता. सकाळी पालखीसोहळा पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ झाला. वाकडेवाडी, कासारवाडीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पालखी सोहळा दाखल झाला. त्यानंतर गोकुळ चौक, शगुन चौक मार्गे पिंपरीगावात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोहळा प्रवेशिला. या वेळी पिंपरीकरांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. पालखी येताच जोगमहाराज प्रासादिक दिंडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात थंडावा जाणवत होता.
या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, क्रीडा समिती सभापती समीर मासूळकर, नगरसेविका उषा वाघेरे, संदीप वाघेरे, अमर कापसे, गोलांडे मामा, मनोहर सुपेकर, विजय जाचक, अण्णा कापसे, दत्तात्रेय वाघेरे, दिलीप दातीर-पाटील, नंदू कापसे, राजाराम कुदळे, राहुल नलावडे आदी उपस्थित होते. पालखी मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. तसेच विठूरायाचा महिमा सांगणारी भक्ती, भावगीते सुरू होती. या वेळी विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.
विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज यांच्यासह वारकऱ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यानंतर ढोलपथकांच्या गजरात आणि रांगोळ्यांच्या पायघड्यांवरून पालखी भैरवनाथ मंदिरात आणण्यात आली. पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी परंपरेप्रमाणे आरती झाली. रात्री जोग महाराज दिंडीच्या वतीने जागर झाला. ग्रामस्थ आणि असंख्य सिंधी बांधवांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नप्रसाद आणि फराळाचे वाटप करण्यात आले.
सोहळ्याची आज होणार सांगता
पालखी शनिवारी सकाळी सातला देहूकडे प्रस्थान ठेवणार आहे. निगडीतील खंडोबा मंदिर येथे सकाळी १०ला विसावा होईल. त्यानंतर देहूरोडमार्गे चिंचोलीतील शनिमंदिर आणि अनगडशाहवलीबाबा दर्गा येथे परंपरेप्रमाणे आरती होणार आहे. देहूतील मुख्य मंदिरात दुपारी तीनच्या सुमारास पालखी परतेल. संत तुकाराममहाराज संस्थानाच्या वतीने वारकऱ्यांना नारळप्रसाद दिला जाईल. फराळवाटप होईल आणि सोहळ्याची सांगता होईल, असे संस्थानचे संत तुकाराममहाराज देवस्थानाचे अध्यक्ष शांताराम मोरे यांनी सांगितले.
पावसाच्या कृपेने सुखावले वारकरी
पावसाचे दान मागत निघालेल्या सोहळ्याच्या वाटचालीत पावसाची कृपा झाली. त्यामुळे वारकरी सुखावला. हे समाधान परतीच्या वाटेवरील वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. पिंपरी-चिंचवड परिसरात सोहळा प्रवेशिला तेव्हा पावसाची भुरभुर जाणवली. जाणीव फाउंडेशनचे सह्याद्री ढोलपथकाने दणदणाट केला. तसेच ढोल-ताशापथकांनीही सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी दत्तात्रय सोनवणे यांनी संत तुकाराममहाराज पालखी रथाची प्रतिकृती देवस्थानाचे अध्यक्ष शांताराम मोरे यांना भेट म्हणून दिली