तरूणाईला पोकेमॉन गो याड लागलयं..
By admin | Published: August 12, 2016 04:12 PM2016-08-12T16:12:15+5:302016-08-12T16:12:38+5:30
जगभरात सध्या पोकेमॉन गो या व्हर्च्युअल खेळाची धुम सुरू आहे. अकोल्यात सुद्धा तरूणाईला पोकेमॉन गोने याड लावल्याचे दिसून येत आहे.
Next
>नितीन गव्हाळे
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ - जगभरात सध्या पोकेमॉन गो या व्हर्च्युअल खेळाची धुम सुरू आहे. अकोल्यात सुद्धा तरूणाईला पोकेमॉन गोने याड लावल्याचे दिसून येत आहे. पॉकेमॉन पकडण्याच्या नादापायी युवक रस्त्यांवर फिरता फिरता कुठेच्या कुठे पोहोचत असल्याच्या घटना शहरामध्ये उघडकीस आल्या आहे. पॉकेमन गो खेळ खेळताना, काही विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी पकडून समज दिल्याचा प्रकार अकोल्यात समोर आला आहे.
आपल्या देशामध्ये पोकेमॉन गो खेळाचे अधिकृत लॉन्चिंग झालेले नाही. परंतु हा खेळ पायरेटेड एॅपद्वारे स्मार्टफोनवर डाऊनलोड करून तरूण खेळत आहेत. कॅमेरा आणि जीपीएसच्या मदतीने या खेळातील पॉकेमॉन शोधण्यासाठी तरूण मुले मोबाईल हातात धरून घराबाहेर पडत आहेत. पॉकेमॉन हा इंटरेस्टिंग खेळ असल्यामुळे तरूणाई त्याकडे अधिक आकर्षीत झाल्याचे दिसून येत आहे. जगभरात अनेक देशांमध्ये हा खेळ खेळल्या जात असून, त्याचे अनेक मजेदार किस्से आणि त्याचे दुष्परिणामही टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर येत आहेत. शुक्रवारी सकाळी दोन विद्यार्थी मोटारसायकलवर बसून जवाहर नगर चौकाकडे जात होते. मोटारसायकलवर मागे बसलेला एक विद्यार्थी मोबाईलवर पॉकेमॉन गेम खेळत होता. पॉकेमॉन जिथे जिथे जात होता, याठिकाणच्या रस्त्यांवर हा विद्यार्थी आपल्या मित्राला मोटारसायकल टाकायला सांगत होता. दरम्यान जवाहर चौकामध्ये त्यांच्या मोटारसायकलने एका इसमास धडक दिली. त्यात इसमाचा पाय फ्रॅक्चर झाला. पॉकेमॉन खेळामुळे हा अपघात घडल्याची चर्चा याठिकाणी होती.
पोकेमॉनच्या प्रेमात लाखो लोक पडले असून, काहींनी तर पॉकेमॉनसाठी नोकरी सोडल्याच्याही वार्ता कानावर आल्या आहेत. असा हा पोकेमॉनचा खेळ अकोल्यापर्यंतही येवून पोहोचला असून, तरूणाईने या खेळाला अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. कुटूंबातील लोकांनाही नेमका पोकेमॉन आहे तरी कोण? असा प्रश्न पडला आहे. परंतु घरातील लहान मुलांनाही आता पॉकेमॉन गो माहित झाला आहे. शहरातील शेकडो युवकांनी हा खेळ डाऊनलोड केला असून, कॅमेरा सुरू करून जीपीएसच्या माध्यमातून तरूण पॉकेमॉनच्या शोधार्थ बाहेर पडायला लागले आहेत. पॉकेमॉन हे फिरत, फिरत पकडावे लागत असल्याने, तरूण भान हरपून मोबाईल हातात घेऊन रस्त्यांवर चालत निघतात. पॉकेमॉन ज्याठिकाणी दिसेल त्याठिकाणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान युवकांना रस्त्यांवरून वाहने येत आहेत, आपण राँग साईडने चाललो आहे. याचे भान नसल्याचे प्रकार घडत आहेत. बुधवारी तोष्णीवाल लेआऊट परिसरातील दोन, तीन विद्यार्थ्यांना वाहतुक पोलिसांनी पकडले. पॉकेमॉन खेळताना हे विद्यार्थी रस्त्यांवरून वाहनांची तमा न बाळगता, फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी त्यांना पकडून समज दिल्याचा प्रकार समोर आला. या घटनेवरून अकोल्यातही पोकेमॉन गो चे याड लागल्याचे अधोरेखित होत आहे.
पॉकेमॉनमुळे जीव धोक्यात
पॉकेमॉन खेळाच्या प्रेमात विद्यार्थी, युवक पडले आहेत. कोणी पायी तर कोणी मोटारसायकलवरच मोबाईलच्या माध्यमातून पॉगेमॉन गो खेळत आहेत. अगदी भान हरपून हा खेळ सुरू असल्याने, समोरून येणारी वाहने, मोटारसायकल याकडेही लक्ष राहत नाही. मोटारसायकलवर मागे बसून खेळणारे विद्यार्थीही पॉकेमॉनच्या मागे धावत, कुठेही आणि कोणत्याही रस्त्यांवर क्षणीच वळण घेतात. या प्रकारांमुळे रस्त्यांवरील नागरीक, शालेय विद्यार्थी, खेळणारे विद्यार्थी सुरक्षित नाहीत.
मुलासोबत आई सुद्धा पॉकेमॉन पकडायला...
एक पालकाने, माझा मुलगा हा कधीच घराबाहेर पडत नव्हता. आम्ही त्याला घराबाहेर पडण्यासाठी सांगायचो. पण तरीही तो तयार व्हायचा नाही. परंतु आता तो दररोज घराबाहेर पडायला लागला. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर तो दररोज पॉकेमॉन पकडायला गल्लीबोळात फिरतो. असा किस्सा सांगितला. एवढेच नाहीतर मुलाला तर पॉकेमॉनने वेड लावलय. परंतु त्याची आई सुद्धा यातून सुटली नाही. ती सुद्धा पॉकेमॉन पकडायला लागल्याचे या पालकांनी सांगितलं.