तुळजाभवानी मंदिरात आठ तोतया पुजार्यांना अटक
By admin | Published: May 11, 2014 12:04 AM2014-05-11T00:04:16+5:302014-05-11T01:33:27+5:30
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात एखादा तोतया पुजारी तुम्हालाही गंडवू शकतो. त्यामुळे पूजा करण्यापूर्वी यापुढे त्या पुजार्याचे ओळखपत्र आठवणीने पाहा.
तुळजापूर(जि.उस्मानाबाद) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात एखादा तोतया पुजारी तुम्हालाही गंडवू शकतो. त्यामुळे पूजा करण्यापूर्वी यापुढे त्या पुजार्याचे ओळखपत्र आठवणीने पाहा. अशा आठ तोतया पुजार्यांना मंदिरात शनिवारी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
लग्नसराई व शाळांना उन्हाळी सुट्या सुरू असल्याने तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. याचाच फायदा घेऊन हे तोतया पुजारी भाविकांची दिशाभूल करून पूजा करीत असतात. तशी माहिती तहसिलदार सुजीत नरहरे यांना मिळाली होती. यावरून शनिवारी दुपारी अडीच ते चार वाजेच्या दरम्यान पुजार्यांवर पाळत ठेवली गेली. या काळात त्यांना आठ तोतया पुजारी आढळून आले. ओळखपत्राची मागणी केली असता ते देऊ शकले नाहीत. शिवाय विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही ते व्यवस्थित देवू शकले नाहीत. त्यामुळे नरहरे यांनी गणेश आदिनाथ रोकडे, सोमनाथ प्रल्हाद शिंदे, औदुंबर महादेव धनके, धनंजय सोमनाथ घोगरे, दिगंबर केरबा पैकीकर, अमोल महादेव ननवरे, राहुल रमेश मुखेडकर, लक्ष्मीकांत प्रभाकर चाटुफळे यांना पकडून मंदिर चौकी पोलिसांच्या ताब्यात दिले. गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ओळखपत्राशिवाय पूजा नाही
तोतयेगिरीच्या घटना वाढल्याने साधारण पाच वर्षांपूर्वी मंदिरात ओळपत्राची सक्ती करण्यात आली. पुजारी वेशात व ओळखपत्र जवळ बाळगूनच पुजार्यांनी भाविकांच्या पूजा कराव्यात, अशा सूचना मंदिर संस्थानच्या वतीने सर्व पुजार्यांना देण्यात आल्या. मंदिर संस्थानतर्फेच हे ओळखपत्र दिले जातात.
ओळखपत्र कोणाला?
एखाद्या बाहेरच्या पुजार्याला देवीच्या मंदिरात पूजा करण्याची इच्छा झालीच तत ते शक्य होणार नाही. १९२० साली संस्थानने तयार केलेल्या वंशावळीत तुमचा जन्म झालेला असेल तरच तुम्ही येथे पुजारी होऊ शकता. हे वंशज आणि त्यांची अनुक्रमणिकाच संस्थानकडे आहे. त्यानुसार या ओळपत्रांचे वाटप होते. या ओळपत्रावर फोटोशिवाय तुमचा अनुक्रमांक देखील असतो.