दर्शन मार्गावरुन तुळजापुरात वादंग
By Admin | Published: September 2, 2016 10:14 PM2016-09-02T22:14:44+5:302016-09-02T22:14:44+5:30
नवरात्रोत्सव काळात पुजाऱ्यांसह भाविकांना महाद्वारातूनच प्रवेश द्यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्वपक्षीयांतर्फे बंदचे आयोजन करण्यात आले आहे
>- ऑनलाइन लोकमत
प्रशासनातर्फे बैठक : सर्वपक्षीयांतर्फे आज बंदची हाक
उस्मानाबाद, दि. 2 - सुरक्षेच्या कारणावरुन प्रशासनाने प्रवेश मार्गात बदल केला आहे. याला तुळजापूरकरांनी विरोध केला असून, नवरात्रोत्सव काळात पुजाऱ्यांसह भाविकांना महाद्वारातूनच प्रवेश द्यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्वपक्षीयांतर्फे बंदचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत शनिवारी सर्व संबंधितांची बैठक घेवून तोडगा काढावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
यात्रा कालावधीत महाद्वारासमोर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेवून प्रशासनाने सुरक्षेच्या कारणावरुन महाद्वाराऐवजी भाविकांना घाटशीळ मार्गे प्रवेश देण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला होता. तोच निर्णय याही वर्षी कायम ठेवण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. मात्र या बदलामुळे पारंपरिक परंपरा मोडीत निघत असल्याचे तसेच याचा फटका पुजाऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसत असल्याचा आरोप करीत, या निर्णयाविरोधात तुळजापूरकर एकत्रीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नवरात्रोत्सवात महाद्वारातूनच प्रवेश द्यावा, या मागणीसाठी प्रतिक रोचकरी व सागर इंगळे यांनी मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले असून, सर्वपक्षीयांतर्फे शनिवारी बंदचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. मागील वर्षी भाविकांची सुरक्षीतता लक्षात घेवून दर्शन मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन मिळाले होते. तसेच यात्रोत्सव काळातही मंदिरासमोर कोंडी झाली नव्हती. मात्र याला काहींचा विरोध आहे. याबाबत सन्मान्य तोडगा काढण्यासाठी शनिवारी मंदिराशी संबंधित असलेल्या सर्व संबंधितांची बैठक घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
भाविक आज विधीला मुकणार
श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी असते. सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत अभिषेक तर दिवसभर गोंधळ, ओटीभरण आणि पाद्यपूजा चालत असते. मात्र पुजाऱ्यांसह गोंधळी लोकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने मंदिराच्या इतिहासात शनिवारी पहिल्यांदाच भाविकांना या धार्मिक विधीपासून वंचित रहावे लागणार आहे. मंदिराच्या रितीरिवाजाप्रमाणे महंतातर्फे करण्यात येणारे अभिषेक, नैवेद्य, धूपारती आणि अंगारा हे विधी मात्र होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.